सातारा (अतुल देशपांडे) : कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा चांदीच्या पादुकांना आज दुपारी पावणे दोन वाजता निरा नदीत दत्त घाटावर माऊली माऊलीच्या जयघोषात वारकरी व पालखी सोहळा प्रमुखांनी नीरा स्नान घातले आणि त्यानंतर लाखो वैष्णवांचा हा वारी सोहळा मोठ्या उत्साहात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात सातारा जिल्ह्यात प्रवेशला. आता पुढील 5 दिवस हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून पुढे वाटचाल करणार आहे.
नीरा नदीच्या जुन्या पूलावरुन नीरा गावातील शिवतक्रार येथील बाजार तळावरील दुपारचा विसावा संपवून हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात असलेल्या पाडेगाव येथील टोलनाक्यावर आल्यावर या सोहळ्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, आ. मकरंद पाटील, आ.आनंदराव पाटील,माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, जि. प. उपाध्यक्ष रवी साळुंखे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजीराव तळपे, माजी जि.प. उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांचेसह अनेक मातब्बर राजकारणी व सहकार क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर सातारा जिल्हा प्रशासनाने भव्य कमानी उभारल्या होत्या. सोहळ्याचे स्वागतासाठी जिल्हाधिकारी व मान्यवरांनी यांनी पालखीला पुढे होत काही काळ फुलांनी सजवलेल्या पालखी रथात चढून पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. पालखी मार्गावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य विभागामार्फत 18 पथके कार्यरत करण्यात आली होती. पाडेगाव येथून टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेला हा पालखी सोहळा दुपारचा विसावा 4 वाजता पाडेगाव फार्म येथे करीत सायंकाळी 6 वाजता लोणंद येथील आजच्या मुक्कामासाठी विसावला.
लोणंद येथे सायंकाळी समाज आरती झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत गावात मुक्कामासाठी उतरलेल्या दिंड्यांमधून भजन, भारुडे, प्रवचन व किर्तनानी लोणंद गाव माऊलीमय झाले होते. पालखी सोहळा लोणंद-फलटण मार्गावर जात असल्याने या मार्गाची वाहतूक जिल्हा प्रशासनाने दुसर्या बाजूने वळवण्यात आली होती. तसेच केवळ दीड दिवसाचा मुक्काम लोणंद येथे होणार असल्याने दर्शनार्थीचीं गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हे लक्षात घेऊन येथे पोलीसांनी दर्शनासाठी विशेष पुरुष व महिलांच्या साठी रांगांची व्यवस्था केली आहे. बुधवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माऊलींचा हा पालखी सोहळा दीड दिवसाच्या मुक्कामानंतर सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणासाठी तरडगावकडे प्रस्थान ठेवणार आहे.