सातारा : कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंद येथे काल सायंकाळ पासून दिड दिवसांसाठी विसावला होता. वारीतला सर्वात मोठा विसावा संपवून आज बुधवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माऊलींचा हा पालखी सोहळा तरडगावकडे निघाला. केवळ 7 किलोमीटरचा हा सर्वात छोटे अंतर असलेला टप्पा आहे.
दरम्यान आज दुपारी पावणे 4 वाजता चांदोबाचा लिंब येथे या सोहळ्याचे पहिले उभे रिंगण लाखो वारकर्यांच्या अतीव उत्साहात आणि टाळ मृदुंगाच्या टिपेला पोहचलेल्या स्वरात पार पडले. माउली, माउली आणि ग्यानबा तुकाराम..चा एकच जयघोष करीत वारकर्यांनी हे वारीतले पहिले उभे रिंगण पाहताना भावनिक आणि मानसिक मेजवानीचा आनंद लुटला. भक्तीमार्गातील नवविधा भक्तीतील नमन प्रदक्षिणा हा या प्रकारातील विधी म्हणजेच रिंगण. भक्ती, शिस्त आणि अनुशासन याचा मुर्तीमंत सोहळा या रिंगणाचेवेळी आपल्याला पहायला मिळतो.
लोणंद ते फलटण हा रस्ता अधिक रुंद झाला, त्यामुळे भाविकांना हे रिंगण पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणारी उंच झाडे तोडली गेली, तरीही मिळेल तेथे उभा रहात कोणी ट्रकवर चढत तर कोणी पाय उंचावत हा रंगलेला अपूर्व सोहळा मनात आणि नजरेत साठवून ठेवला.
दुपारी 4 चे सुमारास चांदोबाचा लिंब या परिसरात माऊलींचा चांदीचा रथ पोहचल्यावर सर्व दिंड्या आहे त्या जागी थांबविण्यात आल्या. सर्व दिंड्यातील वारकर्यांनी दोन्ही बाजूने उभे रहात रिंगणासाठी माऊलींचा जयघोष सुरु केला.
चोपदारांनी उभे रिंगण करण्यासाठी जागा पाहणी केल्यावर पालखी सोहळयापुढे असणारे 2 अश्व ज्यात एकावर स्वत: माऊली स्वार असते व दुसरा शितोळे सरकारांचा आळंदी संस्थानचा घोडा ज्यावर चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेला असतो. या दोन अश्वांनी रिंगण सुरु होण्याचा चोपदारांनी दंड उंचावत इशारा दिल्यावर सर्व पालखी सोहळ्यातील दिंड्यापर्यंत वेगाने धाव घेत पुन्हा माऊलींच्या रथापर्यंत येवून दिंड्यांच्या पुढील टोकाला गेले हे पहिले उभे रिंगण संपन्न केले.
या रिंगणाच्या वेळी अग्रभागी व शेवटच्या टोकाच्या संपर्कासाठी चोपदारांनी वॉकी टॉकीचा वापर करीत पुन्हा एकदा चोपदारंानी चांदीचा राजदंड उंचावत रिंगण संपन्न झाल्याचे जाहीर केले व या दोन्ही अश्वांना चांदीच्या रथापुढे आल्यावर पेढ्यांचा प्रसाद भरवला गेला .आणि एकच अलोट गर्दी उसळली ती म्हणजे या अश्वांच्या टापााखालील माती कपाळी लावत धन्य झाल्याचे समाधान पावण्यासाठीच.
यावेळी परिसरात सुरु असलेला नामघोष आणि महिला तसेच पुरुषांनीही भान न ठेवत घातलेल्या फुगड्या अणि फेराने येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच चालल्याचा भास होत होता.
रिंगणाच्या जागेत काढलेल्या समर्थ रंगावलीच्या सुंदर रांगोळ्या अणि तितक्याच अलोट उत्साहाने न्हालेले वारकरी या रिंगणाचा नजरा आठवत, मनात साठवत रिंगण संपल्यावर तरडगावच्या मुक्कामासाठी सायंकाळी निघाले होते. आता सर्व वारकर्यांना आस लागलीय ती विठ्ठलाच्या दर्शनाचीच.