मुंबई : वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य आहे, दरवर्षी होणार्या पंढरपूर वारीत भाविकांना प्रसादाच्या रुपात एक रोपटे भेट देण्यात यावे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या वन विभागातर्फे दि. 1 जुलै 2016 रोजी करण्यात येत असलेल्या 2 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली.
आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना दि. 1 जुलै 2016 रोजी होणार्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. त्यावेळी वनसचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक सर्जन भगत यावेळी उपस्थित होते. मुंबईतील लोकल रेल्वेच्या दुतर्फा असणार्या मोकळ्या जागेवर महिला बचतगटांना रोपवाटिकेची कामे देण्यात यावीत, अशी सूचनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. या बैठकीनंतर बोलतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात कृषी दिन व वन महोत्सवाचे औचित्य साधून दि. 1 जुलै 2016 रोजी एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. राज्य आणि राष्ट्रीय वननीतीनुसार राज्यात 33 टक्के वनक्षेत्र हवे. परंतू महाराष्ट्रात सध्या 20 टक्के क्षेत्र वनाखाली आहे. ही टक्केवारी वाढवण्यासाठी वन विभागाने इतर 22 शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक, स्वंयसेवी संघटना, शाळा – महाविद्यालये, उद्योग समूह आणि मान्यवर व्यक्तींसह लोकसहभागातून 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यात वन विभाग दीड कोटी झाडं लावत आहे तर बाकीचे 50 लाख रोपं इतर सर्वांच्या सहभागातून लावली जाणार आहेत. मोकळ्या जागा, मैदानं, रस्त्याच्या दोन्ही बाजू, शेतीचे बांध, शाळा – महाविद्यालयाच्या जागा, वन विभागाच्या जमीनी, टेकड्या, शासकीय कार्यालयांच्याठिकाणी असलेल्या मोकळ्या जागा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारितील मोकळ्या जागा अशाठिकाणी ही वृक्ष लागवड होणार असून लावलेली रोपं जगवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
लोकांनाही आता वृक्ष लागवडीचे महत्व लक्षात येऊ लागले आहे. लोक स्वत:हून वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. राज्यात वृक्ष लागवडीसाठी, जमीनीत पाणी मुरवण्यासाठी खुप सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. याचा लाभ वन विभाग राबवित असलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीला नक्की होईल आणि शासनाच्या या कामात लोक स्वत: पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करतील असा विश्वास निर्माण झाला असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.