सातारा दि. ( प्रतिनिधी ) :- अखंड मानवी जीवनाला ‘अत्त दीप भव् ‘ अर्थात स्वयंप्रकाशित व्हा हा मूल्य संदेश ज्यांनी दिला त्या गौतम बुध्दांचा विचार आज अवघे जग स्वीकारत आहे. वैश्विक पातळीवर बुध्द हाच मानव कल्याणाचा सर्वोत्तम मौलिक ठेवा असल्याने जगाला ‘युध्द नको बुध्द हवा’ असे म्हटले जाते. आज याच बुध्दांचा विचार घेऊन जगभरातील असंख्य विद्यापीठे नव्या पिढ्यांना जगण्याचे आणि जीवनाचे मूल्यभान देण्याचे काम करताहेत. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाने बुध्दांचा ‘अत्त दीप भव् ‘ हा विचारसंदेश विद्यापीठाचे बोधवाक्य म्हणून अनुसरले असल्याने रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडियाच्या वतीने अशोकबापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज भीमराव ते भाऊराव अभिनंदन मार्च काढून जल्लोष व्यक्त केला. शिवाय विद्यापीठ व्यवास्थापनाकडे अभिनंदनाचे पत्र सुपूर्द केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची वाटचालच बोधीवृक्षाच्या सानिध्यात झालेली आहे. धननीच्या बागेत जी पहिली शाळा भरवली गेली पिंपळाच्या झाडाखाली. महामानव डॉ. आंबेडकरांनी १९५६ ला बुध्द धम्म अनुसरला आणि तो नव्याने या भारतभूमीत रुजवला, वाढवला आणि जगभर पसरवला. आंबेडकरांच्या या कार्याबद्दल आणि एकूणच त्यांच्या सहवासाने भाऊराव भारावून गेले. दोघांची मैत्री घट्ट झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या आईच्या अर्थात भीमाबाईंच्या नावाने इंग्रजीतील मुलींची पहिली शाळा भाऊरावांनी साताऱ्यात सुरू केली. भाऊरावांनी ही शाळा काढण्यासाठी१४ एप्रिल ला अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयतीदिवशी महत्वपूर्ण पत्र लिहिले. ते पत्र भाऊरांवाच्या आयुष्यातील अखेरचे पत्र होते. यावरूनच भीमराव आणि भाऊराव यांच्यातला वैचारिक स्नेह तसेच जिव्काहाळा काय होता हे स्पष्ट होते.
अत्त दीप भव् म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. स्वतःच स्वतःचा मार्गदाता व्हा. स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हा. स्वतःच स्वतःची प्रेरणा व्हा. कोणी सांगते आहे म्हणून एखादी गोष्ट प्रमाण मानू नका तर ती गोष्ट स्वतः तपासा, त्यावर विचार कारा आणि मग त्यातले तथ्य जाणून ती स्वीकारा. स्वतःच्या कार्यक्षमता ओळखा आणि त्या सर्व क्षमतेने उत्थानासाठी पुढे झेपवा. आपण स्वतःच स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार असतो, म्हणून स्वतःतला अंधार नष्ट करून स्वतःमधला उजेड बाहेर काढा, म्हणजेच स्वतः प्रकाशित व्हा अर्थात अत्त दीप भव् !
बुध्दांचा हा अत्यंत मौलिक विचारसंदेश विद्यापीठाच्या नियामक मंडळाने विद्यापीठाचे बोधवाक्य म्हणून स्वीकारला. याचा जल्लोष व्यक्त करण्यासाठी भीमरव ते भाऊराव असा रिपाइंने अभिनंदन मार्च काढला. यामध्ये रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांच्यासह डॉ. संपतराव कांबळे, श्रीकांत निकाळजे, अप्पासाहेब गायकवाड, वैभव गायकवाड, आप्पा तुपे, प्रतिक गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. भीमराव ते भाऊराव या जल्लोष अभिवादन मार्चदरम्यान प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तेथून हा मार्च निघाला आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीवर पुष्पांजली करुन समाप्त झाला. अभिनंदनाचे पत्र विद्यापीठ व्यवस्थापनाच्या वतीने धैर्यशील माने, प्रशांत सांळुंखे, नितीन काळे यांनी स्वीकारले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊराव पाटील यांचा जयघोष करण्यात आला.