कराड : शहरातील नागरीकांनी नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, व मला मतदान करून विजयी केले. तेव्हा नगराध्यक्षपदाच्या मिळालेल्या संधीचे सोने करून शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी प्रयत्नशिल राहीन अशी ग्वाही भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी दिली. नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
प्रथम भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य भरत पाटील, जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष श्री पेंढारकर, शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सौ. विद्या पावसकर, अपक्ष नगरसेविका मिनाज पटवेकर, इंद्रजीत गुजर, करिश्मा इंगवले तसेच इतर नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर सर्व विभाग प्रमुख यांनी नगराध्यक्षांचे अभिनंदन केले.
जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर (आण्णा) म्हणाले, कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीत नागरिकांनी पहिल्यांदाच भाजपाचा नगराध्यक्ष निवडुन इतिहास घडविला आहे. भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणानुसार पालिकेचा कारभार विकासात्मक करून शहरवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सभागृहात आमचे बहुमत नसले तरी विरोधक विकास कामाच्या मुद्यावर आम्हाला सहकार्य करतील.
भरत पाटील म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले, आण्णा जेष्ठ नगरसेवक आहेत. स्मार्ट सिटी ही त्यांची अनेक वर्षाची संकल्पना आहे. ती संकल्पना ते सत्यात उतरवतील. पालिकेला राज्य व केंद्र शासनाचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहरातील नागरीकांनी भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास दाखवून नगराध्यक्ष निवडला आहे. त्याचा आम्हांला अभिमान आहे. तेव्हा नगराध्यक्षाही जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाहीत.