सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सार्वजनिक हिताची जास्तीत जास्त कामे घ्यावीत. प्रत्येक ग्रामपंचायतीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सुरु झाली पाहिजेत. या कामांच्या प्रगतीची माहिती होण्यासाठी एक व्हॉटस्अप ग्रुप करावा या ग्रुपवर कामाच्या प्रगतीची माहिती रोज द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.
म्हसवड येथील शासकीय विश्रामगृहात टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, सर्व प्रांताधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार यावेळी उपस्थित होते.
ज्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्या गावांमध्ये ग्रामसेवकाने उपस्थित राहून देखरेखीखाली पाण्याचे वाटप करावे. गावातील नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी. ग्रामापंचायतीकडून टँकरची मागणी आल्यास तात्काळ मंजूर करा. पाण्याची उपलब्धता पाहून आत्तापासूनच वाढीव टँकरची मागणी करा. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक हिताची कामे घ्यावीत. यासाठी सरपंच आणि गावातील जानकार लोकांची बैठक घ्यावी. या कामी तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे.
टंचाई आराखड्याचे कामे तात्काळ पूर्ण करा. अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, टँकरचे प्रस्ताव दोन दिवसांत मंजूर करा. तसेच चारा छावणीची मागाणी आल्यास प्रांत व तहसीलदारांनी पाहणी करुन प्रस्ताव सादर करावेत. टंचाईच्या अनुषंगाने अधिकार्यांनी गावोगावी भेट देऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.नरेगा अंतर्गत ग्रामपंचायतींनी सार्वजनिक कामांवर भर द्यावा. तसेच टंचाईच्या अनुषंगाने ग्रामसेवकांनी गावातच राहीले पाहिजे. गावात टँकरने पाणी वाटपावेळी ग्रामसेवकाने स्वत: उपस्थित रहावे. अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिल्या.
म्हसवड येथील चारा छावणीस जिल्हाधिकार्यांची भेट
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज माण तालुक्यातील म्हसवड येथील चारा छावणीस भेट देऊन चारा छावणीतील शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जनावरांना चारा, पाणी , पेंड व्यवस्थित मिळतो का याची विचारपूस केली. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी रोज चारा छावणीस भेट देतात का याबाबतही शेतकर्यांशी चर्चा केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हालचाल रजिस्टर, छावणी भेट रजिस्टर, चारा वाटप रजिस्टर, चारा स्टॉक रजिस्टर, पेंड स्टॉक रजिस्टरची तपासणी केली.
रोजगार हमी योजनेच्या कामांच्या प्रगतीसाठी व्हॉटअप ग्रुप तयार : जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES

