टेंभू-तारळीने देसाई, देशमुखांना राजकीय गारवा

वडूज : कायमस्वरुपी दुष्काळाची चर्चा असणार्‍या खटाव-माण तालुक्यात दरवर्षीप्रमाणे याही खेपेस दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. वेगवेगळ्या पाणी योजनांच्या माध्यमातून काही गावांची तहान भागत आहे. या योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेले नेते तसेच दुष्काळी परस्थितीत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. माण तालुक्यातील वरकुटे मलवडी भागात टेंभू योजनेचे पाणी आले आहे. तर अनेक वर्षे रखडलेल्या तारळीच्या कॅनॉलमध्येही चालू वर्षी पाणी खळाळू लागले आहे. या दोन्ही योजनांच्या कामामुळे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई व शिवसेनेचे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य रणजितसिंह देशमुख या दोघांना चांगलाच राजकीय गारवा मिळणार असल्याची चर्चा आहे. तर दुष्काळात अनेक गावांना स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना भेटी देण्याबरोबर प्रसंगी भरीव सहकार्य देण्याचे धोरण शेखरभाऊ गोरेंनी राबविले आहे. त्यांच्या या धुमधडाक्यामुळे गावोगावचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. वरकुटे – मलवडी परिसरात टेंभूचे पाणी आल्याने मायणीकरांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. या भागात पाणी कधी येणार ? या प्रश्‍नाने माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर सोशल मिडीयावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक अनिलभाऊ देसाई यांनी स्वत:च्या राजकीय कारकिर्दीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रीमंडळातील पावरबाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माण तालुक्याच्या दौर्‍यावर आणले. त्याचबरोबर कुकुडवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून भावजयी सुवर्णा देसाई यांना भाजपाच्या चिन्हावर मताधिक्याने निवडून आणले. हे प्रभावी काम दाखवून टेंभू योजनेचे पाणी व इतर मागण्या वरिष्ठांच्या गळी उतरवण्यात अनिलभाऊ यशस्वी झाले. आज महाबळेश्‍वरवाडी तलावात टेंभूचे पाणी येवू लागले आहे. या पाण्यामुळे वरकुटे मलवडी, बनगरवाडी, शेनवडी, काळचौंडी, कुरणेवाडी, बागलवाडी यासह 16 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा काहीअंशी प्रश्‍न सुटणार आहे. एवढे मोठे काम झाल्यानंतर त्याचे श्रेय घेणार नाहीत ते चाणाक्ष देसाई कसले. टेंभूचे पाणी ज्या ठिकाणी माण तालुक्यात पहिल्यांदा आले त्या ठिकाणी देसाई समर्थकांनी परिसरातील वृध्द महिलांसह युवक व जेष्ठ कार्यकत्यांना घेवून भेट देण्याबरोबर द्रुकश्राव्य प्रसारमाध्यमासमोर बोलते केले. यानिमित्ताने हा मुद्दा देसाईंनी चांगलाच कॅश केल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटत नाही. यानिमित्ताने विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने अनिलभाऊ पुन्हा चर्चेत आले आहेत.
देसाई यांच्यासह शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख यांनी लोकसभा निवडणूकीत भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आपल्या कुवतीप्रमाणे प्रामाणिकपणे काम केले. मात्र गोरे बंधूंच्या धबाडक्यामुळे पौर्णिमेच्या चांदण्यात चांदण्यांचे अस्तित्व तितकेसे प्रभावी जाणवले नाही. या पार्श्‍वभूमीवर हे दोन्ही नेते काहीअंशी बॅकफुटवर गेल्याचे जाणवत होते. मात्र तारळी योजनेचे पाणी गेल्या चार दिवसात निमसोड जिल्हा परिषद गटात खळाळू लागले आहे. या प्रश्‍नासंदर्भात धोंडेवाडी, सुर्याचीवाडी परिसरातील कार्यकत्यांनी अनेकवेळा अर्ज, विनंत्या करण्याबरोबर प्रसंगी आंदोलनही केले होते. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याची गांभीर्याने दखल घेवून पाटबंधारे प्रशासनाने तातडीने तारळी योजनेचे काम मार्गी लागले. आंदोलनकर्त्या मंडळींना अडचणीच्या काळात अनेकवेळा हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यामुळे तारळीच्या पाण्यात श्री. देशमुखांनाही श्रेयाचा काहीअंशी वाटा मिळत आहे. त्यांनीही निवडक कार्यकत्यांना घेवून तारळीच्या कॅनॉलकडे धाव घेवून पाण्याची पाहणी केली.
* शेखरभाऊंचा धुमधडाका
दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी, प्रशासन व पक्षीय पातळीवर जनतेला दिलासा देत आहेत. मात्र डॅशिंग युवा नेते शेखरभाऊ गोरे यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने दोन्ही तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा व वॉटरकप स्पर्धेला भरीव मदत, बक्षीस योजना या माध्यमातून धुमधडाका सुरु केला आहे. त्यांच्या माध्यमातून खटाव तालुक्यातील गणेशवाडी, कानकात्रे, औंध, गोरेगांव (निमसोड), हिंगणे, त्रिमली, तडवळे, पडळ या आठ गावांना तर माण तालुक्यातील 48 गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. वॉटरकप स्पर्धेतील वरुड, गोंदवले खुर्द, पानवण, काळचौंडी, तरसवाडी, कलेढोण, विखळे, पाचवड, निमसोड, बोथे, शिंदी बु.॥, महिमानगड, पिंगळी बु.॥, मार्डी, शिंदी खुर्द, झाशी, राजवडी आदी गावात पोकलॅण्ड मशनरी व इतर सहकार्य देण्यात आले आहे. तर पिंगळी येथे स्पर्धेतील श्रमकर्‍यांना 1 दिवस अल्पोपहारही देण्यात आला. तसेच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणार्‍या गावास पाच लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांच्या या कृतिने इतर पदाधिकार्‍यांनाही पदरमोडी करण्याची वेळ आली आहे. कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनीही आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वॉटरकप स्पर्धेत प्रभावी काम सुरु असणार्‍या गावांना भरीव मदत करण्याची मानसिकता दाखविल्याची चर्चा आहे.
* डॉ. येळगांवकर चर्चेत
वरकुटे-मलवडी परिसरात टेंभूचे पाणी आल्याने हे पाणी मायणीी तलावाकडे कधी झेपावणार ? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. तर त्यांचे पारंपारिक विरोधक या पाण्याच्या मुद्यावरुन वेगवेगळ्या प्रसार व समाजमाध्यमांच्या माध्यमातून पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचे प्रयत्न करीत आहेत. तर विरोधकांच्या या कृतिला उत्तर म्हणून डॉक्टर भक्त आत्तापर्यंत येळगांवकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांची कात्रणे, चालू कामाचे फोटो सेशन व्हायरल करत आहेत. तर स्वत: डॉ. येळगांवकरांनीही हे काम मोठे आहे. यथावकाश पुर्ण होईल. त्यामुळे कोणी सर्वसामन्य जनतेमध्ये बुध्दीभेद करु नये. असे आवाहन समाजमाध्यमातून केले आहे.
* आजी-माजी आमदारांचा दौर्‍यात सहभाग
विधानसभेसाठी संभाव्य इच्छुक असलेले वरील उमेदवार दुष्काळी परिस्थतीत स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. तर विद्यमान आमदार जयकुमार गोरे व विधानपरिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे या दोघांनी नेत्यांच्या दौर्‍यात सहभाग नोंदवून कार्यरत असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपा मंत्री चंद्रकांत दादांनी म्हसवड येथील माणदेशी फौंडेशनच्या चारा छावणीस भेट दिली. त्यावेळी भाजपाईंची चांगलीच गर्दी होती. तर राज्याचे कृषीराज्यमंत्री व सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी शिक्षकांचे बाहुबली नेते बळवंतराव पाटील यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या आंधळी व टाकेवाडी या दोन गांवच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या चारा छावणीत भेट दिली. यावेळी मैत्रिचा धागा वापरत जयाभाऊंनी अचुक टायमिंग गाठले. तर म्हवड येथील पवार साहेबांच्या दौर्‍यात माण तालुक्यातील नेतेमंडळींबरोबर खटावचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनीही हजेरी लावून कार्यभार उरकला. मागील दुष्काळाप्रमाणेच यावर्षीही घार्गे यांच्या माध्यमातून मोठा पुढाकार घेण्याची अपेक्षा सोसायटी चालक व समर्थक कार्यकत्यांमध्ये आहे. या परस्थितीत ते कितपत रस घेणार याकडे अनेकांच्या नजरा आहेत.