गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या कर्तबगारीची…!
मधमाशीच्या डंखापासून ‘मध’ काढणारी नारी अर्थातच सौ. रोहीणी शिर्के…!
लेखन:- सौ.यशस्वीनीदेवी सत्यजितसिंह पाटणकर.
पाटण सारख्या डोंगर-दऱ्यांच्या आणि निसर्गाच्या वरदानाने नटलेल्या खोऱ्यात रान फुलांचे सौंदर्य अप्रतिमच! १२ महिने फुलनारी फुले आणि विविध औषधी वनस्पतींचा असलेला खजिना यामुळे येथे मधुमक्षिका पालन व्यवसाय चांगला चालू शकतो आणि पाटण सारख्या ग्रामीण भागात एक चांगला लघुउद्योग उभा राहु शकतो, हे पाटण तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांनी ओळखले होते. त्यांनी आपली ही संकल्पना पाटण मतदारसंघातील एका महिला मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना मांडली. त्या मेळाव्यामध्ये रोहीणी शिर्के याही उपस्थित होत्या. रोहीणी यांचे मुळ गाव हे पाटण जवळील आडुळ. तसा रोहीणींचा मुळचा स्वभाव धाडसी. कोणतेही आव्हान स्विकारणे व ते यशस्वीपणे जिद्दीने पार पाडणे हे त्यांच्या स्वभावातच होते. पाटण तालुक्यातील एका नेत्याची खोटी थापाबाजी ऐकून भर सभेत उभा राहून त्याला जाब विचारणारी १६-१७ वर्षांची मुलगी रोहीणीच होत्या! त्यांच्या याच करारी स्वभावामुळे व अन्याया विरुद्ध लढण्याच्या गुणांमुळेच पाटण तालुक्याचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी अलिकडेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवती अध्यक्षा हे पद देऊन त्यांचा गौरव केला आहे.
रोहीणींनी मधुमक्षिका पालन हा उद्योग करायचा ठरवले. आपल्या मुलीच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणाऱ्या वडिलांनी येथे मात्र विरोध केला. “ही असली कामे मुलींची नाहीत. मधमाश्यांना पकडणे, मध गोळा करणे तुला जमणार नाही…साधी एक माशी चावली तर ४ दिवस हात धरून बसशील. पण एकदा मनाशी पक्का निर्णय झाल्यावर, आपण हा उद्योग करायचा म्हणजे करायचा, त्यासाठी वाट्टेल ते करायचे पण सर्वांना यशस्वी होऊन दाखवायचेच.
सर्व नकारात्मक विचार आणि नकारात्मक सल्ले बाजूला ठेवून त्यांनी व इतर १० महिलांनी मधुगंध शेतकरी महिला बचत गटाची स्थापना केली. पुढे याच महिला बचत गटाच्या माध्यमातून या उद्योगासाठी लागणारे भांडवल त्यांनी उभे केले.
कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हटल्यावर त्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. रोहिणी व त्यांच्या बचतगटातील महिलांनी मधुमक्षिका पालन या विषयावर महाबळेश्वर येथे प्रशिक्षण घेतले. या ठिकाणी त्यांना योग्य ठिकाणी मधपेट्या ठेवणे, मधमाश्यांना पकडणे, मध गोळा करणे, विविध प्रकारच्या मधमाश्यांना कसे ओळखायचे इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण मिळाले. रोहीणींनी या सर्व गोष्टी अत्यंत लक्ष देऊन प्रामाणिकपणे शिकून घेतल्या. त्यामुळेच त्या आज मधमाश्यांना पकडण्यापासून ते मध गोळा करणे, मध पॅक करणे या सर्व गोष्टी स्वतः च करतात.
कोयना खोऱ्यातील निसर्ग संपन्नतेमुळे सुरवातीलाच मध भरपूर प्रमाणात गोळा होऊ लागला. पण त्याची विक्री कशी करायची ? या मधासाठी ग्राहक कसा मिळवायचा ? हा प्रश्न आता रोहीणींच्या समोर उभा राहिला होता. शिवाय बाजारामध्ये अगोदरच खुप प्रस्थापित मध विक्री करणाऱ्या कंपन्या होत्याच. पाटण सारख्या ग्रामीण भागात मध सहजपण उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी मधाला मागणी खुपच कमी होती. मग हा मध विकण्यासाठी त्यांना व इतर महिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी महिला बचत गटांचे उत्पादन विक्रीसाठी होणाऱ्या मेळाव्यांमध्ये स्टॉल लावायला सुरवात केली. येथे दिवसभर उन्हात उभे राहूनही काही पदरात पडत नव्हते. या मेळाव्यांमध्ये येणाऱ्या महिलांना लोणची-पापड यातच जास्त रस असायचा. मग येणाऱ्या पै-पाहुण्यांना मधाविषयी सांगून हा मध विक्री करण्याचाही प्रयत्न सुरु झाला होता. सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते पण व्यवसाय वाढण्याची चिन्हे दिसत नव्हती. आतापर्यंतचा व्यवसाय ना नफा , ना तोटा अशाच तत्वावर चालत होता. अशातच रोहीणी एके दिवशी एका राजकीय कार्यक्रमासाठी पाटण ला वाड्यात आल्या होत्या ,तिथे त्यांची भेट पाटणकरांच्या सुष्ना सौ. ऐश्वर्यादेवी याज्ञसेन पाटणकर यांच्याशी झाली. ऐश्वर्यादेवी या एक उच्च शिक्षित, जगामध्ये रोज नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाशी सांगड असणाऱ्या कर्तबगार महिला होत्या. रोहिणींची धडपड आणि जिद्द पाहून त्यांनी रोहीणींना मार्गदर्शन केले. त्यांनी रोहीणींना समजावून सांगितले सध्याचे युग हे इंटरनेट व डिजिटल मार्केटिंगचे आहे. आज छोट्याशा सुई पासून इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे, अन्नपदार्थ सर्वकाही ऑनलाईन विकले जाऊ शकते. त्यांनी सांगितले की तुम्हीही मार्केटिंगसाठी इंटरनेटचा वापर करा. डिजिटल मार्केटिंगमुळे तुम्हांला मुंबई-पुणे यांसारख्या शहरातील ग्राहक मिळेल. कारण या शहरांमध्ये नैसर्गिक मध दुर्मिळच आहे. शिवाय सध्या अनेक औषध उपचारासाठी नैसर्गिक मधाचा वापर वाढला आहे त्यामुळे तुमच्या मधासाठी मोठी मागणी होऊ शकते. रोहीणींसह सर्वांना त्यांचे म्हणने पटले. आता मध विक्री व मार्केटिंगसाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर सुरु झाला. रोहीणी यांनी मध विक्रीसाठी डिजीटल मार्केटिंगचा इतका चांगला वापर करून घेतला कि त्यांना *’डिजिटल वुमन’* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आता मधाची विक्री वाढली होती. रोज नवनवीन ग्राहक मिळत होता पण हा ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी मधाची गुणवत्ता व नैसर्गिकपणा जपणे खुप महत्त्वाचे होते. या गोष्टी टिकून राहिल्या तरच ग्राहक कायमस्वरूपी टिकून राहणार होता आणि उद्योग वाढणार होता. येथे पुन्हा एकदा सौ. ऐश्वर्यादेवी पाटणकर यांनी त्यांना मदत केली. मधाची गुणवत्ता आणि नैसर्गिकपणा कसा टिकवायचा या गोष्टींसाठी त्यांनी तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवून दिले.
आता मधुगंधचा मध १२ महिने टिकतो , हेच त्यांच्या मधाचे वैशिष्ट्य. बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर कोणत्याही मधापेक्षा जास्त गुणवत्ता असलेला व खुप काळ चांगला राहणारा, जराही भेसळ नसलेला मध म्हणून मधुगंधचा मध ओळखला जातो.
मधुगंधचा मध विविध औषध उपचार, आयुर्वेदीक उपचार, खाद्यपदार्थांमध्ये, लहाण मुलांसाठी वापरला जातो. आज संपूर्ण भारतामध्ये मधुगंधच्या मधाला मागणी आहे. मुंबई, पुणे, दिल्ली या शहरांमध्ये या मधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मधुगंधच्या या नैसर्गिक मधाला परदेशातूनही मागणी होत आहे. उद्योग वाढत आहे, वर्षाला ७ ते १० लाखांची उलाढाल होत आहे. रोहीणींना अजूनही उद्योग वाढवायचा आहे. येणाऱ्या भविष्य काळात मधुगंधचा विस्तार नक्कीच होईल. आज अनेक परदेशी लोक रोहीणींना भेटायला येतात. मधुमक्षिका पालनाविषयी माहिती घेतात.
भारतीय समाजात आजही स्त्री काही करु शकत नाही, स्त्रीने फक्त चुल आणि मुलच संभाळावे अशीच भावना आहे. पण या संकल्पनेला बगल देऊन आज रोहीणी शिर्के यांच्यासारख्या महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने उद्योग-व्यवसाय-नोकरी करत आहेत.कुठेतरी त्यांचा सन्मान व्हायला हवा तरच इतर महिलांमध्येही त्यांना पाहून आपणही आयुष्यात काही तरी केले पाहिजे अशी भावना जागृत होईल. येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपण ९ दिवस दुर्गा मातेची पुजा करतो त्याचबरोबरीने अशा कर्तबगार महिलांचाही सन्मान केला पाहिजे त्यांचे कर्तृत्व समाजासमोर आणले पाहिजे.
रोहीणी तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगला प्रसंग कोणता असे विचारले असता ,त्या अतिशय आंनदाने सांगतात ज्या वडिलांनी मला हा उद्योग सुरु करताना. हे “तुला जमणार नाही” असे सांगितले होते त्याच वडिलांना मी, मला एक पुरस्कार मिळणार होता म्हणून दिल्लीला विमानाने घेऊन गेले होते. जेव्हा स्टेजवर मी पुरस्कार घेत होते तेंव्हा त्यांना असे वाटले “जो सन्मान माझा मुलगा मला देऊ शकला नाही तो सन्मान आज माझ्या मुलीने मला मिळवून दिला…!” आज माझ्या वडिलांना माझा अभिमान वाटतो यापेक्षा चांगले काय असेल माझ्या आयुष्यात.
रोहीणी शिर्केंना व त्यांच्या साथी महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
पाटण प्रतिनिधी:- (शंकर मोहिते.)