सातारा :- संस्कार भारती सातारा जिल्हा साहित्य विधा विभाग आणि दीपलक्ष्मी पतसंस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “आषाढाच्या प्रथम दिवशी” या कार्यक्रमाला श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शब्द, सूर आणि कवितांच्या पावसात सातारकर जणू ओले चिंबच होऊन गेले. कार्यक्रमाची सुरुवात कवी कालिदासांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन नेने यांचे “महाकवी कालिदास- चरित्र आणि वाङ्मय” या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले. त्याचबरोबर त्यांनी मेघदूत काव्यातील काही अंशाचे वाचनही केले. कार्यक्रमाच्या “मल्हार रंग” या दुसऱ्या भागात ॲड. अमित द्रविड यांनी राग मल्हारातील विविध प्रकारांची ओळख शास्त्रीय गायनाने करून देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर शांताराम दयाळ यांनी तर हार्मोनियमवर बाळासाहेब चव्हाण यांनी साथ केली. कार्यक्रमाच्या “मन चिंब पावसाळी” या तिसऱ्या भागामध्ये मराठीतील विविध मान्यवर कवींच्या पावसाळी कवितांचे अभिवाचन डॉ. सुनील देशपांडे, रमाकांत देशपांडे, सुरेखा कुलकर्णी, प्रतिभा गजरमल, राजवी राक्षे, शिरीष चिटणीस आणि श्रेया गोलीवडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय दीक्षित आणि प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र निवेदन डॉ. सुनील देशपांडे आणि रमाकांत देशपांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप चरेगावकर, डॉ. सुनील देशपांडे, संजीव आरेकर, शिरीष चिटणीस, शुभम बल्लाळ, सुरेखा कुलकर्णी, रमाकांत देशपांडे आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित श्रोत्यांनी अतिशय उत्तम दाद दिली.
शब्द, सूर आणि कवितांच्या पावसात सातारकर ओलेचिंब ; संस्कार भारतीचा “आषाढाच्या प्रथम दिवशी” कार्यक्रम
RELATED ARTICLES