सातारा हिल हाफ मॅरेथॉनसाठी विक्रमी वेळात नावनोंदणी !

साताराः दिनांक 25 आगस्ट 2019 रोजी होणार्‍या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या 8 व्या आवृत्तीच्या खुल्या प्रवर्गातील स्पर्धकांसाठी असणारी ऑनलाईन नोंदणी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक 7 एप्रिल 2019 रोजी पहाटे 5.00 वाजता सुरु झाली अन अवघ्या 1 तास 15 मिनिटांत बाहेरगावच्या व सातार्‍यातील सुमारे 4000 धावपटूंनी नोंदणी करुन एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
यापुर्वीच सातारा जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी राखीव असणारी ऑनलाईन नांव नोंदणी 1 एप्रिल रोजी सुरू झाली होती. तब्बल 2000 सातारकरांनी यात फक्त दीड दिवसात विक्रमी नावनोंदणी केली होती. म्हणजेच एकूण 6000 मॅरेथॉनपटूंनी 21 किलोमीटर अंतराच्या मुख्य शर्यतीत सहभाग नोंदविला आहे. यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे हे विशेष.
इतक्या कमी वेळेत एवढया मोठ्या संख्येने स्पर्धकांनी नाव नोंदणी केली, यावरून या स्पर्धेची लोकप्रियता किती आहे हे दिसून येते.
सातारा शहराला लाभलेले नैसर्गिक वरदान, तसेच स्पर्धेचे केले जाणारे शिस्तबद्ध आणि सुयोग्य नियोजन, सातारकर नागरिकांचा स्पर्धेला असणारा भक्कम पाठिंबा आणि वाढता सहभाग ही यामागची मुख्य कारणे आहेत.
सातारची ओळख आता देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नकाशावर मॅरेथॉनचे सातारा अशी झाली आहे.
सातारा हिल हाफ मरेथॉनची नावनोंदणी कधी सुरु होतेय याकडे देशविदेशातील हजारो स्पर्धक अगदी डोळे लावून वाट पाहत असतात आणि ऑनलाईन पद्ध्तीने नावनोंदणी सुरू होताच केवळ काही तासांतच सर्व जागा भरल्या जातात.
नोंद घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे पुर्वी सातारकरांची नावनोंदणी करण्यासाठी ऑनलाईन व्यतिरिक्त ऑफलाईन फॉर्म सुद्धा भरून घेतले जात. परंतु त्यामुळे बर्‍याच अडचणी यायच्या, चुकीची माहिती भरली जायची किंवा माहिती संकलित करण्यात अनेक अडचणी येत. संयोजकांनी हळू हळू लोकांना ऑनलाईन कडे वळविण्याचा प्रयत्न केला व आता गेली दोन वर्षापासून तर 100 टक्के नावनोंदणी ऑनलाईन केली आहे आणि त्यालासुद्धा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन होणार नाही, जमणार नाही, सातारकर करणार नाहीत, असा नकारात्मक विचार न करता – केल्याने होत आहे रे…. असा पवित्रा घेतल्यास काहीही अशक्य नाही हेच यातून सिद्ध होते.
शिस्त पाळल्यामुळे आणि लोकांना वेळेत नावनोंदणी करण्याचे महत्व पटवून दिल्यामुळे आता स्पर्धेच्या तब्बल 5 महिने आधीच सर्व सातारकरांनी नावनोंदणी ऑनलाईन पद्ध्तीने पूर्ण केली आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. हा एक मोठा सकारात्मक बदल आहे.
चला तर मग आपण यावर्षीच्या सातारा हिल हाफ मरेथान स्पर्धेच्या 8 व्या वर्षाच्या पर्वाच्या तयारीला लागूया असे आवाहन संयोजकांनी केले आहे.