सातारा : अॅड. धैर्यशील दादा सातारचे भूषण आहेत. त्यांचा आज गौरव झाला. हा सत्कार त्यांच्या घरचा आहे. सातारा नगरपालिकेचा हा कार्यक्रम स्तुत्य आहे. या सत्कारामुळे लोकांच्यापुढे आदर्श मांडला जात आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यानी वाटचाल केली. ते अष्टपैलू आहेत असे उद्गार राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी काढले.
सातारा नगरपालिका आणि नगरपरिषद शिक्षण समिती यांच्यावतीने शाहूकला मंदिरात आयोजित मंगळवारी कै. श्री. छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (दादा) महाराज कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. सातारचे ज्येष्ठ विधिज्ञ यावेळी अॅड. धैर्यशील पाटील यांना कै. श्री. छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (दादा) महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना राजमातांनी वरील उद्गार काढले. यावेळी उत्कृष्ट पालिका पुरस्कार पाचगणी आणि कराड नगरपालिकेला देण्यात आला. कै. श्री. छ. प्रतापसिंह महाराज उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सातारा शहरातील अकरा पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरव करण्यात आला.
रंगमंचावर राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाचगणी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, नगरसेविका स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केला. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलाने झाल्यावर आपल्या प्रास्ताविक भाषणात उपनगराध्यक्ष सुहासराजे शिर्के म्हणाले की, हा पुरस्कार देण्यासाठी पालिकेने समिती स्थापन करुन योग्य व्यक्तीची निवड केली. क्रिडा क्षेत्रात सातारचे नाव उज्वल करणार्या खेळाडूंचाही गौरव करताना विशेष आनंद होतो. 2008 सालापासून हे पुरस्कार पालिका प्रदान करत असून आजवर अनेक मान्यवरांना यावेळी गौरवण्यात येत आहे. याचा मोठा आनंद होतो.
नगराध्यक्षा सौ. माधवी कदम आपल्या मनोगतात म्हणाल्या, या पुरस्कार प्रदान सोहळ्यामुळे सातारा पालिका आणि सातारा शहराचे नाव राज्यभरात पोहोचले आहे. आणि खर्या अर्थाने पालिकेकडून या पुरस्काराला वेगळी उंची प्राप्त होत आहे.
पत्रकार विनोद कुलकर्णी व हरिष पाटणे यानी या पुरस्कारामागील भूमिका विषद करताना अशा पुरस्काराने सातारा पालिका खर्या अर्थाने राज्यभर पोहचत आहे. पालिकेच्या बजटमध्ये विशेष तरतूद करुन देशातील एकमेव पालिका असून जी पुरस्कार पत्रकारांना देत आहे व त्यांच्या कार्याची दखल घेत आहे. यानंतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यामध्ये कै. श्री. छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले पुरस्कार 2019 अॅड. धैर्यशील पाटील यांना, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्विकारताना जयवंत गुजर, पांडूरंग पवार, दिपक दिक्षीत, मोहन पाटील, आदेश खताळ, विशाल कदम, तुषार तपासे, प्रमोद इंगळे, जावेद खान, गुरुनाथ जाधव, संग्राम निकाळजे यांना तर लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष मा. श्री. छ. प्रतापसिंह उर्फ दादामहाराज पुरस्कार नगरपरिषद पाचगणी व नगरपरिषद कराड तसेच स्वामी विवेकानंद पुरस्कार श्री रामकृष्ण सेवा मंडळाचे पदाधिकारी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सातारचे नाव आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर झळकावणार्या राजमाता जिजाउ पुरस्कार स्विकारताना ललिता केशव, सोनाली हेळवी, आर्या देशपांडे, वैष्णवी पवार, सुदेष्णा शिवणकर, मयुरी देवरे, मोहन घोरपडे, ईशान शानबाग, यश राजेमाडीक, तेजराज मांढरे, यासर मुलाणी यांनाही गौरवण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, आजचा कार्यक्रम पाहून पारणे फिटले. कारण नसताना खूप कौतुक झाले. आता मला कोणाची दृष्ट लागणार नाही. आयुष्यात कमवायचे तरी काय. आयुष्य कधी गेले समजले नाही. कॉलेजला दांडी मारत होतो. प्रेम असेच राहू द्या. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. सर्वांसाठी जगणार. प्रत्येकावर प्रेम करणार. सर्वांवर खूप प्रेम करतो. दादांचा आदर्श घेऊन मी वाटचाल करतो. मला सर्वांनी प्रेम दिले. माझे पारणे फिटले. असच राहणार काय बदल होणार नाही. फक्त तुमच्यात बदल होऊन देऊ नका. गाणं ऐकल्याशिवाय मजा पण येत नाही. तुम्हाला हसवले. खासदार दादा हवे होते. त्यांनी न्याय दिला असता.
सत्काराला उत्तर देताना अॅड. धैर्यशील पाटील म्हणाले, आपल्याला इतिहास नावडता झाला आहे. 1881 ला कास तलावाचे काम सातारा पालिकेने सुरू केला. 1886 ला त्याचे काम पूर्ण झाले. महाबळेश्वरचा शोध महाराजांनी लावला. महाराजांच्या विरोधात ब्रिटिशांचे कान भरले. महाराजांना त्यांनी गादीवरून बाजूला केले. नेहरू पुरस्कारापेक्षा मला हा पुरस्कार फार महत्वाचा वाटतो. कारण हा पुरस्कार घरचा आहे. मी सातारा नगरपालिका शाळेत शिकलो त्याचा मला अभिमान आहे. आपण सर्वसामान्य माणसांसाठी काम करणे आवश्यक आहे. मी लहान असताना दास कॅपिटल वाचत असताना चक्क झोप आली. नंतर मी ते पूर्ण वाचले. जीवन कायद्यापेक्षा विस्तृत आहे. माझ्या भूमीने माझा सत्कार केला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजमाता श्री. छ. कल्पनाराजे म्हणाल्या की,अॅड. दादानां पुरस्कार देण्यात पालिकेने खूप उशीर केला आहे. पालिका प्रशासनाने सुधारणा करायला हव्या आहेत. दादा ग्रेट आहेत. त्यांच्यापुढे आम्ही नतमस्तक आहे. सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्ती प्राईड ऑफ सातारा आहेत. या सर्वांना भविष्यातील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहल दामले यांनी केले. समारंभास संभाजीराव पाटणे, अॅड. सौ. दिपा पाटील, पाचगणीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कराडकर, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, निशांत पाटील, अॅड. आप्पासाहेब उत्तेकर यांच्यासह सातारा नगरपालिकेच्या विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगसेविका व सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. धैर्यशील पाटील हे ग्रेट असून ते सातारचे भूषण आहेत : राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले ; कै. श्री. छत्रपती प्रतापसिंहराजे महाराज (दादा) महाराज कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पुरस्कारांचे वितरण
RELATED ARTICLES