कृषी सभापतींच्या आरोपांचा अनिल देसाईंनी घेतला समाचार
सातारा ः सन 2012-13 साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत गोंदवले गटातून सदाशिवराव पोळ (तात्या) यांचे चिरंजीव संदीप पोळ यांचे तिकीट कापणार्या शिवाजी शिंदे यांनी पुतणा – मावशीचे प्रेम दाखवून आमच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करू नये. त्यावेळी संदिप पोळ यांचे तिकीट कापून स्वतः चे नाव कुकुडवाड गटातून उमेदवार म्हणून पुढे केल्यानंतर सदाशिवराव पोळ(तात्या यांच्या डोळ्यात पाणी आले होते, याचे साक्षीदार ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील (तात्या) होते. याची आठवण करून देत सैराट या चित्रपटातील परश्या, आर्ची ही मुख्य पात्रे आहेत. हा शिवाजी शिंदे तर मंग्या निघाला अशा शब्दात जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत खरपूस समाचार घेतला. दरम्यान, कुणाचे तरी पाय चाटून, दलाली करून तुमच्यासारखे मी राजकारणात टिकलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अनिल देसाई पुढे म्हणाले,यापूर्वी झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूकीमध्ये गोंदवले जिल्हा परिषद गटातून माझ्यासाठी तर कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून माझे सहकारी जालिदंर खरात यांच्यासाठी मी पक्षाकडे तिकीट मागितले होते.त्याचवेळी गोंदवले जि.प गटातून संदिप पोळ यांच्यासाठी सदाशिवराव पोळ (तात्या) पक्षाकडे तिकीट मागत होते. कुकुडवाड गटातून निवडणूक लढविण्यासाठी शिवाजी शिंदे हे इच्छुक होते. तिकीट निश्चितीची वेळ आल्यानंतर याच शिवाजी शिंदे यांनी मला बाजूला घेवून कुकुडवाड गटातून मला तिकीट मिळवून द्या, मी गोंदवले जि.प गटाचा प्रश्न मिटवतो असे भोजलिंगाची शपथ घेवून सांगितले. प्रत्यक्षात गोंदवले जि.प गटात माझे तिकीट निश्चित होत आहे असे दिसताच शिवाजी शिंदे यांनी सदाशिवराव पोळ(तात्या) यांना गप्प बसायला भाग पाडले तेव्हा सदाशिवराव पोळ (तात्या) यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आज तेच शिवाजी शिंदे पूतना – मावशीचे प्रेम दाखवत आहेत.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धनचे माजी सभापती शिवाजी शिंदे यांनी बुधवारी सातार्यात पत्रकार परिषद घेवून माझ्यावर केलेल्या आरोपांमुळेच माण, सातारा जिल्ह्याचे राजकारण माझ्याभोवतीच फिरते, हे मला आज कळाले अशा शब्दांत शिंदेची खिल्ली उडवत अनिल देसाई पुढे म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदासाठी सध्या मी इच्छुक नाही त्यामुळे मी कट कारस्थान करून शिवाजी शिंदेवर अविश्वास ठराव आणण्याचा प्रश्नच नाही. स्वतः सुभाष नरळे यांनी शिवाजी शिंदे त्यांच्याविरूद्धच कट कारस्थान करत असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आणून दिले होते. तीन वेळा जिल्हा मध्यवर्ती बँक, एकदा पंचायत समिती, एकदा जिल्हा परिषद निवडणूक लढून जिंकलो. बँक असोसिएशनचा अध्यक्षही झालो.दुसरीकडे ग्रामपंचायतीमध्ये शिवाजी शिंदे यांचा एकदा तर त्यांच्या पत्नीचा ग्रामपंचायतीस, पंचायत समिती निवडणूकीतही पराभव झाला होता. आमच्याबरोबर आल्यानंतर शिवाजी शिंदे ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले होते, ही बाब निदर्शनास आणून देत अनिल देसाई पुढे म्हणाले,आत्तापर्यंत मी लढवलेल्या सर्व निवडणूका स्वतःच्या हिमतीवर लढवल्या.कुणाचे तरी पाय चाटून, दलाली करून शिवाजी शिंदेसारखा मी राजकारणात आलो नाही. कुकुडवाड गटात दिवसभर माझ्याकडून मदत घ्यायची आणि गोंदवले गटात मला पाडण्याची कट कारस्थाने रचणार्या शिवाजी शिंदेचा माझ्यावर एकही उपकार नाही, उलट त्यांनाच निवडून आणून मी उपकार केले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत मी कोणाची मदत मिळेल म्हणून उतरलो नाही, यावेळीही मी माझे मत सदाशिवराव पोळ(तात्या) यांनाच दिले होते हे नेत्यांनाही माहीत आहे.
माणदेशी महिला बँकेत शिवाजी शिंदे यांच्या पत्नी संचालिका होत्या त्या काळात शिवाजी शिंदे यांनी इथे भ्रष्टाचार चाललाय, तिथे चुकीचे चालले आहे, असे सांगण्याचे उद्योग केल्याने त्यांच्या पत्नीला संचालक पदावरून केव्हा काढले हे शिवाजी शिंदेनाही कळाले नसल्याचे सांगून अनिल देसाई पुढे म्हणाले, आपण आता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जावू शकत नाही त्यामुळे स्वतःचा नाकर्तेपणा दाखवण्यासाठी कालपर्यंत रामराजेंचे पाय चाटणारा माणूस अविश्वास ठराव आणल्यानंतर माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. माण तालुक्यात कुठेही खट्ट झाले तरीही अनिल देसाई यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जाते. निवडणूकीत पराभव झाल्यानंतर अनिल देसाई यांनी पाडले, जिंकले की स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो असे गुणगान करणार्या भुरट्याला पद दिल्यानंतर काय होत हे आज राष्ट्रवादीतील नेत्यांनी पाहिले आहे.
विधानसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढविली त्यामुळे सदाशिवराव पोळ(तात्या) यांच्या पाठीत मी खंजीर खुपसण्याचा प्रश्नच नाही, राजकारण मी माझ्या हिमतीने करेन जेव्हा मला वाटेल जनता स्वीकारणार नाही तेव्हा मी घरी बसेन मात्र ज्यांचे आयुष्य कटकारस्थान करण्यात गेले त्या शिवाजी शिंदे यांनी दुसर्यावर चिखलफेक करू नये. शिंदेनी आजपर्यंत स्वतःचा स्वार्थ साधण्यातच धन्यता मानली, सदाशिव पोळ आणि अनिल देसाई यांच्या गटात भांडणे लावण्याची कामे केली असल्याचे सांगून देसाई पुढे म्हणाले, सैराट या चित्रपटात परश्या, आर्ची ही मुख्य पात्रे आहेत. शिवाजी शिंदे हा तर मंग्या निघाला. भविष्यात या मंग्याने आपली लायकी ओळखून आरोप करावेत असा इशारा अनिल देसाई यांनी दिला.
सुभाष नरळे यांच्यारूपाने लोणार समाजाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळत असल्याचे पाहून शिवाजी शिंदे यांनी त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिवाजी शिंदे यांना यापुढे लोणार समाज उभा करणार नाही.
हा शिवाजी शिंदे तर ‘मंग्या’ निघाला
RELATED ARTICLES