पुसेगांव : सेवागिरी महाराज की जय आणि ओम नमो नारायणाच्या जयघोषात पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. रथोत्सवासाठी लाखो भाविक पुसेगावात दाखल झाले आहेत. पहाटे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव आणि विश्वस्तांच्या हस्ते महाराजांच्या संजीवन समाधीची विधीवत पूजा करण्यात आली. पर्यावरणमंत्री रामदास कदम, खा. उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पशुसंवर्धनमंत्रीमहादेव जानकर, आ. शशिकांत शिंदे, आ.जयकुमार गोरे, नितीन बानुगडे पाटील सर्व विश्वस्तांच्या हस्ते मानाच्या रथाचे पूजन करण्यात आले.
भाविक मोठ्या भक्तीभावाने रथावर बेल, फुले, नारळ आणि नोटांच्या माळा अर्पण करत आहेत. रथ मंदीर परिसरात असतानाच संपूर्ण रथ नोटांच्या माळांनी शृंगारला आहे.
यात्रेसाठी लाखो भाविक पुसेगाव नगरीत दाखल झाले आहेत.
रथोत्सवानिमित्त सातारा, कोरेगाव, वडूज, दहिवडी, फलटण येथून 250 जादा एस. टी. गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुसेगाव परिसरातील गावोगावी गाड्यांची सोय करण्यात आली आहे. गावाच्या चारही दिशांना एस. टी. महामंडळाने पिकअप शेड उभारली आहेत. यात्रेसाठी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने विविध उपाययोजना केल्या आहेत. यात्रेकरूंना शुद्ध पाणी व 24 तास वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मंदिर आणि यात्रा स्थळावर वैद्यकीय मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, सपोनि विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. भाविकांसाठी रथाच्या डाव्या बाजूने पुढे व उजव्या बाजूने मागे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने यात्रेकरूंसाठी मुबलक पाण्याची सोय केल्याचे उपसरपंच प्रकाश जाधव यांनी सांगितले. सेवागिरी महाराजांच्या 71 व्या पुण्यस्मरणानिमित्त छ. शिवाजी चौक ते शासकीय विद्यानिकेतनपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विविध व्यावसायिकांनी स्टॉल उभारले आहेत. लहानांपासून मोठ्यांच्या मनोरंजनासाठी
पाळणे, गेम्सचे स्टॉल लागले आहेत. यात्रेत तमाशा आला
असून बैल बाजारात जातिवंत खिलार जनावरांची गर्दी वाढू लागली आहे. यात्रेनिमित्त दि. 9 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांना लाखो लोक हजेरी लावणार आहेत. या काळात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष आहे. यात्रेवर देखरेख व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने मुख्य रस्ता व यात्रा स्थळावर 20 सीसीटीव्ही कॅमेर्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रा काळात वाहतुकीत बदल
यात्रेत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. गावाच्या चारही दिशांनी येणार्या वाहनांना अडथळा येणार नाही, याची दक्षता वाहतूक पोलीस घेणार आहेत. सातारा बाजूकडून दहिवडीकडे जाणारी वाहने नेर, राजापूर, कुळकजाई मार्गे; दहिवडीकडून येणारी वाहने पिंगळी फाट्यावरून वडूज, चौकीचा आंबा मार्गे व दुचाकी वाहने कटगुण, खटाव, खातगुण, जाखणगाव मार्गे विसापूर फाटा मार्गे साताराकडे वळवण्यात आली आहेत. वडूजकडून फलटणला जाणारी व येणारी वाहने खटाव, जाखणगाव, विसापूर फाटा, नेर मार्गे वळवण्यात येणार आहेत. दहिवडी ते डिस्कळ जाणारी वाहतूक निढळ, मलवडी राजापूर मार्गे जातील. ऊस वाहतुकीची वाहने पुसेगावात न येता विसापूर फाटा, चौकीचा आंबा मार्गे पळशीकडे वळवण्यात आली आहेत.
विविध पथके कार्यरत
यात्रेत घातपात होऊ नये याकरिता बॉम्ब शोधक व नाशक पथक, घातपात विरोधी तपासणी पथक नेमण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिलांची छेडछाड होऊ नये, मालमत्तेचे संरक्षण, अवैध धंदे व गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांची पथके नेमण्यात आली आहेत. परजिल्ह्यातील गुन्हेगारांबाबत माहिती असलेले गुन्हे शाखेचे कर्मचारीही नेमण्यात आले आहेत, अशी माहिती सपोनि घोडके यांनी दिली.
श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरुवात
RELATED ARTICLES