श्रीपाल सबनीस : खासदार उदयनराजे अन मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे नगरी, जि.प. मैदान सातारा : गरिबी भोगणारी, खेड्यापाड्यातील विद्वान पिढी जातीधर्माच्य पलिकडे जाऊन शोधण्याची गरज आहे. ग्रंथ महोत्सवात शंभर स्टॉल लागतात, राज्यातून पुस्तक विक्रीसाठी लोक येतात, चार दिवस सातार्याच्या नगरीत हा ज्ञानाचा उत्सव भरतो. इथं लेखक-वाचक घडतो, समिक्षक जन्माला येतो. बहुआयामी, बहुसांस्कृतीकता बहुकलात्मकता जोपासणारा आणि पचवणारा आदर्श रसिकही जन्माला येतो. सातार्याच्या संस्कृतीचं हे वैभव आहे, असे गौरवोद्गार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यीक श्रीपाल सबनीस यांनी काढले.
येथील जिल्हा परिषद मैदानावरील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे नगरीत सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 20 व्या सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सबनीस बोलत होते. यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर खासदार उदयनराजे भोसले, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षिरसागर, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरिष चिटणीस, वि. ना. लांडगे, शेखर हसबनीस, प्रदिप कांबळे, साहेबराव होळ, डॉ. राजेंद्र माने, आर. पी. निकम, प्रकाशक सुनिताराजे पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
श्रीपाल सबनीस म्हणाले, एकीकडे ऐतिहासिक मानदंड दुसरीकडे सांस्कृतिक मानदंड आहेत. अशा दोन मानदंडाची बेरीज संस्कृतीच्या पातळीवर वर्तमान महाराष्ट्राच्या नकाशावर सातारा जिल्ह्याच्या गौरवात ग्रंथमहोत्सवाने भर टाकली. यातील आयोजकांचे परस्परांशी असलेला संवाद आणि सख्य सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. इतकं सख्य अभावानेच पहायला मिळते. साहित्य वा ग्रंथाची कोणतीही संस्था चालविताना प्रचंड भानगडी महाराष्ट्रात अनुभवत असताना सातार्यात दोन कार्यवाह एकाच पदावरची दोन माणसं गुण्यागोविंदाने काम करतायत याचा आनंद होतोय. त्यामुळेच संस्कृतीची पालखी वाहताना निष्ठा आणि प्रगल्भता महत्वाची. माणसातील जनावरपण जर शिल्लक राहिला असेल तर हे पशुत्व अडीच हजार वर्षांच्या सांस्कृतिक विकासाच्या अजेंड्यावर अजूनही कायम दिसते. या जनावरांचे प्रश्न चिन्ह कस मिटवायचं कसं संपवायचं हा खर्या धर्मासमोरचा प्रश्न आहे. खोटे धर्म, खोटा धार्मिक आणि सत्ताकारणाचा संबंध स्वार्थासाठी बेरीज करणारी दुकानदारी इथं राजकारणात आहे. असंच कुरूप वास्तव महाराष्ट्र आणि देशाच्या माथी बसले असेल तर मग या अध:पतनातून महाराष्ट्राला आणि देशाला कोण वाचवणार या प्रश्नाचं उत्तर सातार्याच्या ग्रंथमहोत्सवाने गेल्या वीस वर्षांपासून दिले आहे. ग्रंथ माणसाला वाचवतील, ग्रंथ माणसाला सुधरवतील, ग्रंथ माणसाला विकसीत करतील, ग्रंथ ज्ञानवंत बनवतील, पशुत्वापासून माणसाची मुक्तता करतील, दु:ख मुक्त मानवता, दु:ख मुक्त संस्कृती हा ग्रंथांचा देयवाद आहे. अत्यंत समृध्दपणे ग्रंथ आपलं दान वाचकांच्या पदरी टाकण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.
खासदार उदयनराजे म्हणाले, वाचनामुळे व्यक्तिमत्वात प्रगल्भता निर्माण होते. तुम्ही काय वाचताय यावर तुम्ही काय घडणार हे ठरतं. त्यामुळे विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून त्यातून स्वत:ला घडविण्याचा प्रयत्न करावा. मराठी भाषेतील समृध्द ग्रंथसंपदा पुढे अनेक पिढ्यांना समृध्द करण्यासाठी सज्ज आहे.
यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षिरसागर, शिरिष चिटणीस, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वी. ना. लांडगे यांना गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी दीपक प्रभावळकर यांनी लिहिलेल्या राजकारणाची सातारा बखर या पुस्तकांसह रामकृष्ण जाधव, शिला जाधव व दिव्या राजमाने यांच्या पुस्तक आणि काव्यसंग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
खेड्यापाड्यातील विद्वान पिढी जातीधर्माच्या पलिकडे शोधण्याची गरज
RELATED ARTICLES