कराड : सर्वसामान्य दूध उत्पादक व ग्राहक केंद्र बिंदू मानून सातत्याने प्रगतीची झेप घेणार्या कराड तालूक्यातील कोयना दूध संघाने बीओटी तत्वावरील सौर उर्जेवरील 250 किलोवॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी आवश्यक करार झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.
त्याचबरोबर राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या माध्यमातून सुमारे 8.5 कोटींचा नवीन प्रस्ताव शासनास सादर करणेत येत असून त्याद्वारे अत्याधुनिक मशिनरीज व त्याचबरोबर उपपदार्थ निर्मितीकरीता जसे तूप, स्टेरलाईज्ड फलेवर मिल्क व प्रतिदिन 2000 लि. क्षमतेच्या आईस्क्रिम प्लँटची उभारणी करणेत धोरण आखले असल्याचे संघाचे अध्यक्ष मारूती यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खोडशी (ता. कराड) येथे कोयना दूध संघावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघाचे उपाध्यक्ष बाबुराव धोकटे, कार्यकारी संचालक अमोल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.यादव म्हणाले, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी राबविलेल्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेमुळे संघाने प्रतिदिन 1.5 लाख लिटर्स क्षमतेच्या अत्याधुनिक प्लँट उभारला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली आहे. या राष्ट्रीय कृषि विकास योजनेमुळे सर्वसामान्य दूध उत्पादकांना जिल्हयात सर्वाधिक दर देण्याचा विक्रम संघाने केला आहे. सर्वाधिक दरामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. तसेच सर्वाधिक दराबरोबरच सन 2015-16 या वर्षात संघास दूध पुरवठा करणार्या दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी 75 पैसे प्रतिलिटर तर गाय दुधासाठी दुधासाठी 55 पैसे प्रतिलिटर दर फरक देऊन संघास दूध उत्पादकांची दिवाळी अधिक गोड केली आहे.