(छाया : शरद कदम, भुरकवडी)
वडूज: खटाव तालुक्यातील दरुज, भुरकवडी परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा व पावसाने लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. महसूल विभागाने शेतकर्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन मदत द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
अचानक झालेल्या या अवकाळी पाऊस व वादळामुळे दरुज येथील आनंदराव मारुती लावंड यांच्या द्राक्ष बागेचे लोखंडी अँगल वाकून द्राक्ष घड जमिनीवर पडले आहेत. या वादळाचा फटका भुरकवडी, रानमळा (सि. कुरोली) या भागातील काही द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. तर भुरकवडी, वाकेश्वर येथील ज्वारी, ऊस, हरभरा, वाटाणा, कांदा या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आगाप पेरलेल्या व चांगल्या ऊंच वाढलेले ज्वारीचे व मका पीक भुईसपाट झाले आहे. कर्जमाफीस होणारी चालढकल, अचानक एकदम वाढलेला हजारो रुपयांचा लाईट बिलाचा बोजा या अस्मानी संकटाने गुदमरुन गेलेला बळीराजा कसाबसा सावरत असतानाच ही नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकरी वर्ग पुरता गांगरुन गेला आहे.
दरम्यान वादळी वार्यात दरुज येथील हणमंत गायकवाड यांचे राहते घर व जनावरांचे पत्र्याचे शेडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.