नारायण लोहार यांच्या अपहरणाचा प्रयत्न?
सातारा : संपूर्ण सातारा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या नागठाणे जि. प. गटासाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर दोन अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये साविआचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले गटाचे उमेदवार समृध्दी तुकाराम जाधव व अपक्ष म्हणून राजकुमार पंढरीनाथ ठेंगे यांनी आज अर्ज दाखल केला आहे. मात्र ठेंगे यांनी डमी अर्ज भरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून दि. 22 ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, नागठाणे जि. प. गटासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले गटाचे समर्थक नारायण उर्प बाळासाहेब सीताराम लोहार हे शुक्रवारी तहसिल कार्यालय सातारा येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते, मात्र अर्ज भरण्यापूर्वीच अज्ञातांनी त्यांच्या चारचाकी गाडीतून अपहरण केल्याची चर्चा सुरु होती. उमेदवारी दाखल करण्याच्या ठिकाणी यानंतर तणावाचे वातावरण पसरले होते, सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नागठाणे जि. प. गटाचे सदस्य किशोर ठोकळे यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी राज्य निवडणुक आयोगाकडून असलेल्या निवडणूक कार्यक्रम निश्चित झाला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या अर्जाची छाननी मंगळवार दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी होणार आहे. दि. 22 रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. दि. 28 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. नागठाणे जि. प. गटामध्ये नागठाणे, पाडळी, निनाम, अतित, सासपडे, गणेशवाडी, काशीळ या गावांचा समावेश असून पुरुष 15 हजार 584 तर महिला 14 हजार 754 असे एकूण 30 हजार 338 मतदारांची नोंद आहे. या निवडणुकीसाठी नगरविकास आघाडीचे अध्यक्ष आ. शिवेंद्रराजे भोसले गटातर्फे अर्ज दाखल झाला नसल्याने तसेच राजकुमार ठेंगे यांचा उर्मी अर्ज दाखल असल्याचा राजकीय वर्तुळात बोलबोला सुरु असल्याने साविआचे अध्यक्ष खा. उदयनराजे भोसले गटाचे उमेदवार समृध्दी जाधव बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या पाच ते सहा महिन्यानंतर जि. प. व पं. स. च्या निवडणूका होणार आहेत. नागठाणे गटासाठी सहा महिन्यासाठी समृध्दी जाधव मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागठाणे जि. प. गटाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सध्या नेते मंडळी भलतेच चार्ज झाले आहेत.