कराड : शहरातील मध्यवर्ती चौकात दुकाने व बँक फोडण्याचा प्रयत्न करणार्या दोन चोरट्यांनी पोलिसांवरच हल्ला करीत लोखंडी गज व कटावणी डोक्यात घालून दोघांना गंभीर जखमी केले. मात्र जखमी अवस्थेत पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली.
दत्त चौकातील पाटील हेरीटेज इमारतीत शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. रक्तबंबाळ स्थितीतही पोलीस कर्मचार्यांनी दोन्ही चोरट्यांना पकडून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून दरोड्याच्या साहित्यासह रोकड केली हस्तगत करण्यात आली आहे. नवल जवानसिंग भुजया (वय 35, रा. नावेल, ता. कुकशी, जि. धार, मध्यप्रदेश) व रायचंद फत्तू वसुनिया (वय 22, रा. मंगरदार, ता. कुकशी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हवालदार तानाजी रतन शिंदे व प्रफुल्ल हिंदुराव गाडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.