सातारा : शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये विरघळून जात नाही, तोपर्यंत तो चांगला शिक्षक होऊ शकत नाही. शिक्षण व्यवस्था डळमळीत होत आहे. सरकारचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दूषित आहे. सरकार बदलले की अभ्यासक्रम बदलतो, हे जगात इतरत्र कोठेही नाही. शिक्षणाकडे आपण कधी गांभीर्याने पाहणार आहोत, असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केला.
सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ विचारवंत संभाजीराव पाटणे, संघाचे अध्यक्ष एस. एन. कात्रे, रमेश चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.
समारंभाची सुरुवात बी.पी.जी. पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलनाने झाली.
यावेळी बोलताना उत्तम कांबळे म्हणाले, शासन शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे गेल्या 70 वर्षे परीक्षा कशी असावी, अभ्यासक्रम कसा असावा, पहिलीपासून इंग्रजी हवे की नको, शाळा एक शिक्षकी हवी का नको, यावरही निर्णय होत नाहीत. शिक्षण व्यवस्था काळाची चाहूल घेत बदल नाहीत. कालबाह्य शिक्षण आपण घेत आहोत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षकांनी ज्ञानी क्लबफ करून तत्वज्ञान उभारावे. देशात दरवर्षी पाच लाख शिक्षकांना आदर्श पुरस्कार दिले जात असतानाही शाळा बंद का पडतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. आ.ह.साळुंखे म्हणाले, प्रत्येक गोष्टी दुसर्या कोणी तरी कराव्यात, यापेक्षा मी प्रयोग करून समाजाला नवे काही तरी देणार, ही भावना शिक्षकांमध्ये हवी. समाजाचे शिक्षक म्हणून काम केले पाहिजे.
संभाजीराव पाटणे म्हणाले, ज्ञानाधिष्ठीत समाज निर्मिती होत नाही, याची वेदना आहे. गरीब समाजाला ज्ञानापासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे. गरिबांची मुले शिकतील का हा प्रश्न आहे. त्यासाठी संपत्तीचे विकेंद्रीकरण व्हायला हवे. संजय घाडगे यांना आदर्श शिक्षक, वनिता बाबर यांना आदर्श मुख्याध्यापक, मानसिंगराव जगताप यांना आदर्श सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सुभद्रा महाबळेश्वरकर यांना आदर्श शिक्षिका, अभिनव भट, निखिल भोसले यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला.समारंभास संपूर्ण जिल्ह्यातून माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकार बदलले की अभ्यासक्रम बदलतो, हे जगात इतरत्र कोठेही नाही : उत्तम कांबळे
RELATED ARTICLES