फलटण ः वाजेगाव येथील उघड्या व दुर्लक्षितपणामुळे धोकादायक असलेल्या पाटणकर डीपीला महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या बेजबाबदार कामामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली व या आगीमध्ये डीपी लगतची अनेक झाडे जळून गेली या ठिकाणी रहिवासी भाग नसल्याने मोठा अनर्थ टळला. उघड्या डीपीमुळे पावसाळ्याच्या सध्याच्या दिवसांत शहरातील व ग्रामीण भागातील उघड्या डीपींची समस्या अजूनही कायम आहे. पावसाळ्यामध्ये अशा डीपींतून शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही या महत्वाच्या बाबींकडे महावितरण साफ दुर्लक्ष करत आहे.
फलटण शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्याच्या दिवसात या धोकादायक झालेल्या डीपींवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत उघड्या डीपींमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी डीपीमध्ये जाऊ नये यासाठी खबरदारी घेऊन पावसाळ्यापुर्वी यावर ठोस कार्यवाही करणे अपेक्षित आहे. परंतु, महावितरणने नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला या डीपी असल्या तरी आजूबाजूस दाट नागरी वस्ती आहेत. पावसात या डीपींमध्ये पाणी गेल्यास किंवा सखल भागात पाणी साचून विद्युतप्रवाह या पाण्यात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागातून तसेच रस्त्यावरून कायमच नागरिकांची वर्दळ असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. काही वेळेस जास्त दाबाने वीज प्रवाह असल्यास डीपीजवळच्या विज वाहक तारांत स्पार्किंग होत असते. पावसाच्या दिवसांत तर अशा घटना नेहमीच पाहण्यास मिळतात. स्पार्किंग मुळे शॉर्ट सर्किट होण्याची व आग ही लागण्याची शक्यता आहे. या संभाव्य प्रकारांची जाणीव महावितरणला असतानाही त्यांच्याकडून यावर काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही. डीपी झाकण्यासाठी किंवा डीपीच्या भोवती संरक्षणासाठी उपाययोजना महावितरण अधिकारी यांच्याकडून काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांतूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील रस्त्यांच्या बाजूलाचअनेक ठिकाणी डीपी आहेत. या ठिकाणी डीपीची अवस्था दयनीय झाली आहे. येथेच नागरिक घरातील ओला व सुका कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डीपीचे लोखंडी दरवाजे तुटले असल्याने फ्यूज उघड्या पडल्या आहेत.
या सगळ्यातूनच दुर्घटनेची शक्यता वाढली आहे. धोकादायक डीपींमुळे अपघात होऊ शकतात यांची कल्पना असतानाही महावितरणकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होताना दिसत नाही तर पावसाळ्यापूर्वी तत्काळ उघड्या डीपीचे बॉक्स बदलावेत अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.
वाजेगाव येथील डीपी उघड्या व दुर्लक्षितपणामुळे धोकादायक
RELATED ARTICLES