साताराः माझी विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा माझ्या आदिवासी समाजाला मान्यता मिळण्याची निशाणी असल्याने मी या अध्यक्षपदाचा स्वीकार केला. आताचा हा माझा सत्कार हा फक्त माझा नसून तो इथे हजारो वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी समाजाचा सत्कार असल्याचे मला वाटते असे मत शहादा येथे होणार्या 13 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ विचारवंत व लेखिका कॉ. नजुबाई गावीत यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ साताराच्या वतीने शहादा येथे होणार्या 13 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ विचारवंत व लेखिका कॉ. नजुबाई गावीत यांचा संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते सातारा येथे साडी – चोळी , सर्वोत्तम भूमिपुत्र – गोतम बुद्ध हा ग्रंथ , शाल , बुके देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी कॉ. नजुबाई गावीत बोलत होत्या . यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विजय मांडके , प्रा गौतम काटकर , रवींद्र घोडराज , प्रा. युवराज जाधव हे उपस्थित होते
आदिवासी साहित्याला इथे मान्यता मिळत नाही. माझ्या स्वतःच्या पुस्तकांकडे अजून हवे तितके लक्ष गेलेले नाही. आदिवासी समाजाची दखलच इथे घेतली जात नसताना विद्रोहीने माझी अध्यक्षपदी निवड करून बहुमान केला याबद्दल मी आभारी आहे. असे हि कॉ. नजुबाई गावीत यांनी सांगितले
यावेळी सत्कार करताना डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले की, कॉ. नजुबाई गावीत यांच्याशी माझे पूर्वीपासूनचे जवळचे संबंध आहेत. त्यांच्या तृष्णा या पहिल्या आत्मनिवेदनपर कादंबरीवर आयोजित परिसंवादात मी बोललो होतो. तर भिवा फरारी आणि नवसा भिल्लीणीचा एल्गार या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनावेळी मी हजर होतो. कॉ. शरद पाटील यांच्याशीदेखील ऐंशीच्या दशकापासून माझे चांगले संबंध होते. नजुबाईंनी शरद पाटलांना अखेरपर्यंत साथ दिली. आता त्यांची विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
यावेळी रश्मी लोटेकर, रविना गोगावले व इतर कार्यकर्त्यांनी क्रांतिगीत सादर केले. यावेळी ज्येष्ठ अभ्यासक व लेखक रविंद्र घोडराज, प्रा. प्रशांत नागावकर ( कोल्हापूर), कॉ. रोशन गावीत ( शहादा ), प्रा. गौतम काटकर, अमित कांबळे, प्रा.अमृत साळुंखे , मयूर खराडे, नम्रता पिंपळे , पूजा दळे,अक्षदा चव्हाण, शिवानी साळुंखे, तेजश्री पाटील, सागर अडागळे लखन जगताप, महेश गुरव , रोहित क्षीरसागर, अमर कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विजय मांडके यांनी केले. आभार प्रा. युवराज जाधव यांनी मानले.
माझा सत्कार म्हणजे हजारो वर्षे दुर्लक्षिल्या गेलेल्या आदिवासी समाजाचा सत्कार आहे : कॉ. नजुबाई गावीत
RELATED ARTICLES