सातारा दि:(अजित जगताप) महाराष्ट्राची लाल परी म्हणजे खऱ्या अर्थाने वर्षभर वारी करणारी माऊली आहे. या माऊलीमुळे अनेकांना इच्छुक स्थळी तसेच देवदर्शन व चांगल्या शुभ कार्य व सहलीला जाण्यास मदत होत आहे. पण, सध्या सातारा बस स्थानकातील फलाट रिकामे व प्रवासी बस स्थानकाच्या बाहेर रस्त्यावर असे विदारक चित्र दिसत आहे.
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अनेक चांगल्या सुविधा देऊन प्रवासी वर्गाला आकर्षित केलेले आहे. आराम बस, शिवशाही बस, शिवनेरी बस, साधी बस, तसेच विना थांबा विना वाहक बस, पार्सल बस अशा अनेक सुविधा निर्माण केलेले आहेत. सध्या सातारा बस स्थानकावर सातारा जिल्हा, पुणे- मुंबई व परराज्यात जाणाऱ्यांसाठी आठ फलाट आहेत. या फलाटावर प्रवाशांनी बसून एसटी बसची वाट पहावी असे संकेत आहेत. परंतु, सध्या वाढती गर्दी असली तरी सातारा बस स्थानकातील फलाटावर तुरळक गर्दी प्रवाशांचे असते. त्याच्यापेक्षा चार पट गर्दी ही बस स्थानकाच्या आवारात बस ये- जा करणाऱ्या रस्त्यावर असते. त्यामुळे अनेक बस चालकांना बस पुढे- मागे घेऊन जाताना काळजीपूर्वक बस घेऊन जावे लागत आहे. दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यास बस चालकालाच दोष दिला जातो. प्रवासी सुद्धा आता प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली बस पकडण्यासाठी जीवाची आटापिटा करत आहेत. याचा सुद्धा आता सर्वांनीच आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
सातारा बस स्थानकातून दररोज पाच ते दहा हजार प्रवासी असतात. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. सुट्टीच्या दिवशी जरी जास्त गर्दी दिसत नसली तरी इतर वेळी मात्र खूपच गर्दी असते. विद्यार्थी व विद्यार्थिनी बस पकडण्यासाठी चक्क रस्त्यावर इच्छुक स्थळी जाणारी बस कुठे लागते? हे माहीत असल्यामुळे त्या बसला गराडा घालून चालकाचे मन विचलित करतात. ही सुद्धा बाब पुढे आलेली आहे.
या सर्व गोष्टीचा विचार करून मोकाट जनावरे, प्राणी व फुकट शंभू व रिकामटेकडे बस स्थानकात येत असतील तर त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करावी. अशी मागणी आता प्रवाशांनी केलेली आहे. याकडे एसटी बस प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे व प्रवासी संघटनेचे विजय महाडिक ,अंकुश शिवणकर यांनी केलेली आहे.
————————————-