औंध: चोराडे (ता.खटाव) येथील फाट्यानजिक रात्रगस्तीवर असलेल्या औंध पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचार्यांना दोन दुचाकी गाडीवर पाच जण संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी संबंधितांना हटकले असता त्यातील चौघेजण दोन दुचाकी गाडया जाग्यावर टाकून ऊसाच्या शेतातून पळून गेले तर पोलिसांनी एका संशयिताला शिताफीने पकडले. दरम्यान औंध पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे मायणीसह परिसरात झालेल्या अनेक चोर्या उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास चोराडे फाटा येथे औंध पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नितीन सजगणे, किरण जाधव, एस.एस. पोळ,चंद्रकांत शिंदे हे रात्रगस्त घालत असताना दोन दुचाकी गाडया संशयितपणे फिरत असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले पोलीस गाडी व पोलीसांना पाहताच त्या दुचाकी गाडयावरील चौघांनी त्याठिकाणी असणार्या टपरीवर चहा पिण्याचे नाटक केले त्यानंतर पोलीसांनी त्यांच्या कडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यातील चौघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर पोलीसांनी शिताफीने एकाला पकडले त्यानंतर ज्या शेताकडे चौघे पळून गेले होते तेथेही पोलीस ,शेतकरी, काही ग्रामस्थांनी संशयितांचा पहाटे शोध घेतला मात्र ते त्याठिकाणाहुन पळून गेले होते. पकडलेला संशयिताचे नाव सोमनाथ लक्ष्मण मोहिते वय 22रा.कडेगाव जि.सांगली आहे.त्याच्या कडून रोख 1366रुपये ,एक टाँमी,दोन मोटरसायकली असा एकूण 66हजार 366रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान पकडलेल्या संशयित सोमनाथ मोहिते व त्याच्या चार साथीदार संशयितांंनी मायणीसह परिसरात अनेक चोर्या केल्याचे उघड झाले असून संशयित सोमनाथ मोहिते याला औंध पोलिसांनी मायणी पोलीसांच्या ताब्यात दिले असून पळून गेलेल्या संशयितांपैकी काही संशयितांना मायणी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती औंध पोलिसांनी दिली दरम्यान औंध पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे मायणी परिसरातील अनेक चोर्या उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कारवाई मध्ये पोलीस हवालदार नितीन सजगणे,किरण जाधव यांच्या सह चंद्रकांत शिंदे,एस.एस.पोळ यांनी परिश्रम घेतले.
चोराडे फाटा येथे दुचाकी चोरीप्रकरणी संशयित ताब्यात
RELATED ARTICLES