मेढा ( वार्ताहर ) मौजे जवळवाडी ता.जावली येथिल ९१ वर्षाचे वय असलेल्या श्रीमती सुलाबाई आनंदराव पाटील या आजींनी कोरोनावर मात करून रायगाव येथून घरी परतल्या आहेत.या आजींचे घरच्यांनी पेढा भरवून स्वागत केले.
बारा दिवसापूर्वी करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमधे या पाटील आजी कोरोना पाॅजीटीव्ह आल्या होत्या. खालावलेली ऑक्सिजन लेवल यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली होती. त्यातच आजींना जेवण जात नव्हते. मेढा ग्रामिण रूग्णालयात बेड शिल्लक नव्हता. जवळवाडी गावच्या आशासेविका सौ विद्या सुरेश जवळ यांनी परस्थितीचे गांभिर्य ओळखुन जावली तालुका आरोग्य अधिकारी श्री भगवानराव मोहीते यांचेशी संपर्क साधला त्यांनीही तातडीने रायगाव ता.जावली येथिल कोरोना सेंटर मधे ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला.
रायगाव कोरोना सेंटर मधील डाॅक्टरांपासून सर्वच कर्मचार्यांनी या आजींची खुप काळजी घेतली. आपली आजी समजून मायेचे दोन घास भरविले. म्हणूनच अवघ्या दहा दिवसात आजी ठणठणीत बर्या होवून घरी परतल्या आहेत. घरी परतलेल्या आजींचे पेढा भरवून सुपुत्र श्री विठ्ठल पाटील व सून अलका यांनी स्वागत केले.
यावेळी जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वर्षा विलास जवळ उपस्थित होत्या त्यांनीही आरोग्यसेवा देणार्या सर्वांचेच आभार मानले.पाटील आजी शतायुष्यी व्हाव्यात यासाठी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
कोरोना झाल्यावर घाबरून न जाता योग्य उपचार व काळजी घेतल्यास कोरोनामुक्त होवू शकतो असा मौलिक संदेश सुलाबाई पाटील या आजींनी सर्वांसमोर ठेवला आहे.