उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत शपथविधी
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर बहुप्रतिक्षित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही शुक्रवारी पार पडला. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 10 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. भाजपाचे सहा, शिवसेनेचे दोन आणि मित्रपक्षांचे दोन अशा 10 जणांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करुन घेतला असला तरी नाराज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथविधीसाठी गैरहजर होते.
मंत्रिमंडळात जयकुमार रावळ, सुभाष देशमुख, मदन येरावार, संभाजीराव निलंगेकर, रवींद्र चव्हाण, पांडुरंग फुंडकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचा समावेश करण्यात आला असून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
महादेव जानकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असून राम शिंदे यांनादेखील प्रमोशन देत कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. यांच्यासोबतच संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, पांडुरंग फुंडकर यांनीदेखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
विस्तारात महिला नाहीतच
मंत्रिमंडळात सध्या पंकजा मुंडे व विद्या ठाकूर या दोनच महिला आहेत. विस्तारातदेखील महिलेचा समावेश नसल्याने मंत्रिमंडळातील महिलांची संख्या दोनच राहणार आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुंबईला संधी दिली जाईल, असा होरा होता. पण तसे झाले नाही.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेला राज्य मंत्रिमंडळ विस्तारातही केवळ दोन राज्यमंत्रिपदांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद वाढवून मिळावे, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून केली, पण मंत्रिपदाबाबत आधीच सूत्र ठरलेले असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देण्यास नकार दिला.