म्हसवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना स्वाभिमानी पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री पद व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊन पश्चिम महाराष्ट्रात सत्ता संतुलन साधले. तर राष्ट्रवादीचे वजनदार नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांची दुसर्यांचा विधान परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच जल्लोष झाला. माण व फलटण तालुक्यातील रामराजे व जानकर समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादीतल्या अंतर्गत विरोधाचा रिमोट कंट्रोल हातात ठेवूनच रामराजे पुन्हा सभापतीपदी विराजमान झाले. तसेच काँग्रेसचीही अंतर्गत लाथाळी त्यांनी अतिशय धूर्तपणे शांत केली. तर पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात ऊस आणि दुध दराची आंदोलन उग्रपणे करुन शेतकर्यांच्या समस्यांची दखल घ्यायला लावणारे दोन झुंजार नेत्यांना लाल दिव्याचा मान मिळाल्याने सातार्याच्या राजकारणाची फडणवीस शासनाने आवर्जुन दखल घेतल्याचे संकेत मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी आज फेर निवड झाले बद्दल माण- खटाव तालुक्या मधील विविध पक्षाचे नेते मंडळीनी मंबईस भेटुन त्यांचे अभिनंदन केले.
भाजपचे माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर, शिवसेनेचे रणजित देशमुख,गणेश रसाळ, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे दावेदार राष्ट्रवादी काँग्रेसचे माण मधील जिल्हा परिषद सदस्य सुभाष नरळे, म्हसवडचे माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, बाळासाहेब माने, प्रदीप तावरे इत्यादींचा समावेश होता. दरम्यान रामराजे नाईक निंबाळकर यांची विधान परिषदेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाले बद्दल म्हसवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन या निवडीचे स्वागत करुन आनंद व्यक्त केला.
पळसावडेत कार्यकर्त्यांचा जल्लोष
माण तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांची राज्याच्या विस्तारित मंत्रीमंडळात समावेश करुन त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल माण तालुक्यामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी फटाक्याची आतषबाजी करुन या निवडीचे जय्योषात स्वागत केले.
म्हसवड येथेही येथील बसस्थानक व शहरातील प्रमुख चौकात आज फटाक्याची आतषबाजी करुन या निवडीचे स्वागत केले.
श्री.जानकर हे माण तालुक्यामधील पळसावडे गावातील धनगर समाजातील शेतकरी कुटुंबातील अभियंता शिक्षणाची पदवी संपादन करुन नोकरी व व्यवसाय न करता राजकारणात सक्रीय झाले व त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. धनगर समाज या पक्षास मोठ्या संख्येने जोडला गेला. व त्यानंतर इतर समाजही या पक्षात सहभागी होत गेला.
राज्यात विशेत: मराठवाडा व विदर्भात त्यांनी या रासपच्या माध्यमाने विधानसभा निवडणुक लढविली विशेष बाब म्हणजे या भागात त्यांच्या पक्षाचे अनेक उमेदवार मताधिक्यात दुसर्या क्रमांकावर होते पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागात त्याच्या उमेदवारांना यश आले नसले तरी मतदारांनी प्रतिसाद दिला होता.