बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या फेसबुकवरच्या पदार्पणामुळे बरीच चर्चेत आल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या आकड्यात झपाट्याने वाढ झाली आहे. कतरिनाच्या फेसबुकवर सक्रिय होण्याबद्दल तिला बी टाउनच्या अनेक कलाकारांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. या सार्या माहोलात सोशल मीडियावर असणारा कतरिनाचा बोलबाला आणखीन काही दिवस असाच सुरु राहण्याचे चित्र आहे. गेले कित्येक दिवस रुपेरी पडद्यापासून दूर असलेली कतरिना तिच्या आगामी बार बार देखो या चित्रपटातील नव्या गाण्याच्या लुकसाठी ट्रेंडमध्ये आली आहे असेच म्हणावे लागेल. करण जोहर, फरहान अख्तर, रितेश सिदवानी, सुनिल लुल्ला यांसारख्या नामवंतांची निर्मिती असणार्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नित्या मेहरा करत आहे.
बार बार देखो या चित्रपटाच्या माध्यमातून नित्या मेहेरा हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. रोमँटिक ड्रामा असणार्या या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून या बहुप्रतिक्षित चित्रपटातील एका गाण्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. याआधी सिद्धार्थ कपूर अॅन्ड सन्स या चित्रपटात दिसला होता, तर कतरिना फितूर या चित्रपटातून झळकली होती. आता हे दोन्ही कलाकार बार बार देखोफ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येणार असल्यामुळे बॉलीवुडमध्ये एका नव्या जोडीची भर पडणार आहे. चित्रपटातील गाण्याची एकच झलक प्रसिद्ध करत निर्मात्यांनी रसिकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. काला चश्मा असे बोल असणारे हे गाणे बरेच गाजणार यात शंकाच नाही. गाण्याच्या पहील्या लूक पोठोपाठ लवकरच काला चश्माफ हे संपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काला चश्माची ही पहीली झलक पाहताना या दोन्ही कलाकारांवर अनेकांच्या नजरा खिळत आहेत.
कतरिना आणि सिद्धार्थची सिझलिंग केमिस्ट्रि असणारा बार बार देखो हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.