शेवटच्या दिवशी 106 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी
पल्लिकल : अनुभवी रंगना हेराथच्या अफलातून गोलंदाजीला इतर गोलंदाजांचीही समर्थ साथ लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकेने आज (शनिवार) अखेरच्या दिवशी 106 धावांनी विजय मिळविला. विजयासाठी 268 धावांचे लक्ष्य असताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 161 धावांमध्येच संपुष्टात आला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने कसोटीमध्ये तब्बल 17 वर्षांनी ऑस्ट्रेलियावर मात केली आहे.
मुसळधार पावसामुळे हा सामना अनिर्णित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अखेरच्या दिवशी रंगना हेराथने सकाळच्या सत्रात लागोपाठ तीन बळी मिळवित ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. ऍडम व्होजेस आणि मिचेल मार्श या दोघांना तर हेराथने बाद केलेच; शिवाय जम बसलेल्या स्टीव्ह स्मिथला बाद करून त्याने ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. कर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथचा हा कसोटीतील पहिलाच पराभव आहे.
21 वर्षीय कुशल मेंडिसचे दुसर्या डावातील झुंजार शतक आणि 38 वर्षीय हेराथने दोन्ही डावांत मिळून घेतलेले नऊ बळी हे श्रीलंकेच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार ठरले.
यापूर्वी 11 सप्टेंबर 1999 रोजी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला कसोटीमध्ये पराभूत केले होते. विशेष म्हणजे, आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये झालेल्या कसोटी सामन्यांमधील हा श्रीलंकेचा दुसराच विजय आहे. या सामन्यातील काही आकडेवारी :
आशिया खंडात ऑस्ट्रेलियाने सलग सातवा कसोटी सामना गमावला आहे. यापूर्वी 2013 मध्ये भारतातील चारही सामने, त्यानंतर 2014 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तानविरुद्धचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने गमावले होते.
स्टीव्हन ओकफी आणि पीटर नेव्हिल या दोघांनी मिळून 178 चेंडू तटवून काढत केवळ चार धावा केल्या. या भागीदारीचा स्ट्राईक रेट होता फक्त 0.13.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सलग 25 निर्धाव षटके टाकली. अशी घटना प्रथमच घडली आहे.
संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका : पहिला डाव : सर्वबाद 117
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : सर्वबाद 203
श्रीलंका : दुसरा डाव : सर्वबाद 353
विजयासाठी लक्ष्य : 268
ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव : सर्वबाद 161