Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपै.माऊली जमदाडेने "बॅक थ्रो' डावावर पाटणचे ऐतिहासिक मैदान मारले

पै.माऊली जमदाडेने “बॅक थ्रो’ डावावर पाटणचे ऐतिहासिक मैदान मारले

पाटण:- माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पाटण येथील बैल बाजार मैदानात झालेल्या ऐतिहासिक जंगी कुस्त्यांच्या मैदानात कोल्हापूरच्या माऊली जमदाडे याने योगेश पवार याला “बॅक थ्रो” डावावर चितपट करून पाटणचे ऐतिहासिक मैदान मारले. तर  महिलांच्या कुस्तीत पै. हर्षदा चव्हाण (सुपने) विरूध्द पै. समृध्दी पाटील (चाफळ) यांच्यातील लढतीत समृध्दी पाटील हिने विजय मिळविला. यावेळी झालेल्या कुस्त्यांनी पाटणवासियांसह कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. संपूर्ण बैल बाजार मैदान परिसर प्रेक्षकांनी भरला होता.

यावेळी युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, हिंद केसरी संतोष वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, बापूराव जाधव, सकसचे व्यवस्थापक राजेंद्र कदम व पश्चिम महाराष्ट्रातून आलेले कुस्ती शौकीन मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

जालना येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा किताप पटकावणारा बाला रफीक हा काही कारणास्तव मैदानात उपस्थित न राहिल्याने कुस्ती शौकीनांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र त्याची सल भरून काढत प्रथम क्रमांकासाठी माऊली जमदाडे विरूध्द योगेश पवार यांच्यात अटीतटीचा सामना पहावयास मिळाला. सुरूवातीला घिस्सा डावावर योगेश पवारला चितपट करण्याचा प्रयत्न माऊली जमदाडे याने केला. मात्र, तो प्रयत्न फसला. तद्‌नंतर अवघ्या पाच ते सात मिनिटातच माऊली जमदाडे याने योगेश पवारला “बॅक थ्रो” डावावर चितपट करत पाटणचे ऐतिहासिक मैदान मारले.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती संतोष दोरवड विरूध्द विलास डोईफोडे अशी अटीतटीची झाली. यामध्ये कुस्ती निकाली होत नाही असे लक्षात आल्यानंतर पंच संतोष वेताळ यांनी गुणांच्या आधारे संतोष दोरवडला विजयी घोषीत केले. तिसऱ्या क्रमांकाची सिकंदर शेख विरूध्द विक्रम पारखे अशी लढत कायम अंजिक्य असणाऱ्या सिकंदर शेख याने जिंकली. संतोष पडळकर विरूध्द अजित पाटील ही चौथ्या क्रमांकाची कुस्ती संतोष पडळकरने व पाचव्या क्रमांकाची कुस्ती संभाजी कळसे विरूध्द विश्वास कारंडे यामध्ये विश्वास कारंडे निकाली कुस्ती केली. या मानाच्या कुस्त्यांचे पंच म्हणून दिलीप पवार, हिंद केसरी संतोष वेताळ, तानाजी चौरे, अमोल साठे, आनंदा शिंदे यांनी काम पाहिले.

यावेळी महिलांच्या कुस्त्या संपन्न झाल्या. पै. हर्षदा चव्हाण सुपने विरूध्द पै. समृध्दी पाटील (चाफळ) यांच्यातील लढतीत समृध्दी पाटीलने विजय संपादन केला. तर पै. जयंती पाटील (कोल्हापूर) विरूध्द पै. वैशाली साळुंखे (किवळ) यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. इतर दोन महिलांच्या कुस्त्या पार पडल्या. या मैदानात लहान-मोठ्या शंभर कुस्त्या पार पडल्या. स्थानिक पैलवानांमध्ये शरद धामणकर, नामदेव घाडगे, आशिष घाडगे, विजय घाडगे, अमित घाडगे, तुकाराम घाडगे यांनी कुस्त्या जिंकल्या.

पाटण तालुक्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कुस्त्या पहिल्यांदाच भरविण्यात आल्याने पाटणच्या प्रेक्षकांनी कुस्त्या पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. कुस्त्या पाहण्यासाठी बाजार मैदान कुस्ती शौकीनांनी खचाखच भरून गेले होते. दुपारी ३ वाजता सुरू झालेले मैदान रात्री ८ वाजता संपले. सर्वात शेवटी प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली. त्यानंतर विजयी पैलवान माऊली जमदाडे यास मानाची गदा, शाल, फेटा देवून युवानेते सत्यजीतसिं पाटणकर, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. निवेदक म्हणून ईश्वरा पाटील (वारणा), सुरेश जाधव (चिंचोली) यांनी काम पाहिले. कुस्त्यांचे मैदान यशस्वी करण्यासाठी दिनकर धामणकर, गणपतराव साळुंखे, सय्यदभाई हकीम, जयवंत सुर्वे, सुरेश सत्रे, विष्णू घाडगे, दिनकर मोरे, ज्ञानदेव घाडगे, तुकाराम गालवे यांच्यासह पाटण तालुका अमृतमहोत्सव कुस्ती नियोजन समितीने परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular