दि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन

पाटण :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्व चातुर्यावर आग्र्याहून सुटका करून ते थेट राजगडावर पोहोचले. या घटनेला यावर्षी ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या दैदिप्यमान इतिहासाला साक्षी मानून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील शिवमावळे आग्रा सुटका मोहिमेवर ( जाणार आहेत. ही मोहीम दि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत या कालावधीत भारतातील विविध राज्यातून छ. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत होणार आहे. या मोहिमेत सर्व शिवमावळ्यांनी एक वेगळी अनुभूती घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सशक्त भारत सातारा जिल्हा संपर्क प्रमुख महेश पवार यांनी केले आहे.
संपूर्ण भारताच्या २२ सुभ्यांचे वर्चस्व असणाऱ्या औरंगजेबाच्या घातकी कैद्येतून आग्रा येथून ३ लाखांच्या खड्या फौजेच्या गराड्यातून सुमारे अडीच हजार किलोमीटरचा प्रवास जीव धोक्यात घालून शिवछत्रपतींनी पूर्ण केला. इतिहासातील हा अतिशय महत्वपूर्ण प्रसंग मानला जात असून या घटनेला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. अंगावर काटा आणणाऱ्या व थरार अनुभवयाला मिळणाऱ्या या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी सशक्त भारततर्फे डॉ. संदीप महिंद गुरूजी यांनी या मोहिमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम शनिवार दि.१० नोव्हेंबरला सकाळी राजगडावरून प्रस्थान करणार आहे. १४ राज्ये, ९१ जिल्हे, ५७ महत्वपूर्ण किल्ले आणि ३३ तीर्थक्षेत्रे अशा पध्दतीने या मोहिमेचा मार्ग असणार आहे. या दरम्यान, भारतातील विविध ठिकाणी १०३ सभांचे नियोजन केले आहे.
या मोहिमेमध्ये सहभागी होणाऱ्या शिवमावळ्यांनी माझी तलवार, माझी भाकरी करीन प्रियतम देशाची चाकरी या उक्तीप्रमाणे स्वत:ची दुचाकी व इंधनाचा खर्च करावयाचा आहे. मात्र मोहिमेतील निवास व भोजन व्यवस्था ही मोहिमेतूनच केली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सोमवार दि. ५ नोव्हेंबरपूर्वी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख महेश पवार (मो. ९८२३९९६६९७) आणि किल्ले सुंदरगड समिती पाटण यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.