शिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.

 

पाटण:- ( शंकर मोहिते ) – दुर्ग भ्रमंती, दुर्ग संवर्धन कशा साठी ? – ढासळलेले बुरुज , तुटलेले तट , उध्वस्त गड हे इतिहासातील पराक्रमाचे साक्ष देणारे . जखमा त्यांच्या अंगावर होतात जे लढतात , त्यांच्यावर नाही जे रडतात. एकेकाळी रयत वाचवण्यासाठी आमच्या गडकोटांनी त्यांच्या छातीवर शत्रुंचे तोफगोळे झेललेत. त्यामुळे एकेकाळी स्थापत्यशस्त्राचा अदभुत रचना असणाऱ्या या गडकोटांची ही अवस्था झाली. परंतु ज्यांना शिवाजी हे नाव माहिती आहे त्यांना हा प्रश्र्न कधीच पडत नाही . कारण शिवराय आणी त्यांचा संघर्ष त्यांना माहिती आहे . आजही महाराष्ट्राचा इतिहास तेजस्वी इतिहास याच गडकोटां मुळे जिवंत आणी ज्वलंत आहे . म्हणूनच दुर्ग भ्रमंती, दुर्ग संवर्धन होणे आवश्यक आहे. तरच पुढच्या पिढीला छ्त्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी कळणार असे शिव अभ्यासक युसूफ हकिम यांनी पाटण येथे आधार सामाजिक संस्थे मार्फत कोजागिरी पोर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणुन बोलताना सांगितले.
यावेळी आधार सामाजिक संस्थेचे अनिल मोहिते, सुनिल क्षीरसागर, डॉ. देशमुख, अॅड. प्रकाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
युसूफ हकिम पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज केवळ शिवाजी महाराजांच्या सारखी वेशभुषा करुन कळणार नाही. तर यासाठी शिवचरीत्र अभ्यासले पाहिजे त्यातील बारकावे जाणुन घेतले पाहिजेत. गडकोट किल्यांची भम्रंती करुण ते न्याहाळले पाहिजेत. त्याचे संवर्धन करुन सुस्थितीत राखले पाहिजेत. तरच आपल्या बरोबर पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज समजणार आहेत. केवळ तरुणांनी दुर्गभ्रमंती, दुर्गसंवर्धना कडे हौस म्हणून न पहाता. संशोधन म्हणून पहावे. यासाठीच महाराष्ट्रभर तरुण शिवमावळ्यांच्यात गडकोट संवर्धन समित्या स्थापन होऊन ठिकठिकाणी किल्यांचे संवर्धन राखले जात आहे. हि अभिमानाची बाब आहे.
यावेळी सुंदरगड दुर्गसंवर्धक – शंकर कुंभार, निलेश फुटाणे, मनोहर यादव, महादेव खैरमोडे, काशिनाथ विभुते, सोमनाथ आग्रे,श्रीगणेश गायकवाड आधार सामाजिक संस्थचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोजागिरी पोर्णिमा निमित्त आधार सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या छत्रपती शिव व्याख्यानाचे प्रमुख वक्ते युसूफ हकिम सर यांना आधार सामाजिक संस्थे कडून २५००/- रूपयेचे देण्यात आलेले मानधन हकिम सर यांच्याकडून किल्ले सुंदरगड संवर्धननसाठी दुर्ग संवर्धक निलेश फुटाणे, शंकर कुंभार, मनोहर यादव सर यांच्याकडे सपुर्द करण्यात आले. शिव व्याख्यानातून येणारा सर्व निधी किल्ले सुंदरगड संवर्धनासाठी देणार असल्याचे शिव व्याख्याते युसूफ हकिम सर यांनी यावेळी जाहिर सांगितले.*