सातारा : देशातील प्रत्येक नागरिक हा गणवेशातील पोलीसच आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन आपण देखील देशाचे हित व सुरक्षितता याचा विचार करुन आजुबाजुस घडणार्या संशयास्पद हालचाली, समाजविघातक व्यक्ती अथवा अनोळखी व्यक्ती, बेवारस वस्तू, वाहने व आकर्षक वस्तु यांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा सातारा पोलीस नियंत्रण कक्षास तातडीने कळवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी केले आहे.
15 ऑगस्ट रोजी देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा 69 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या सणाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय महत्वाच्या व्यक्ती, पदाधिकारी हजर राहणार आहेत. राष्ट्रीय सणाच्या दिवशी देशामधील गतकाळातील अतिरेकी कारवायांचा विचार करता तसेच समाजविघातक व्यक्तींच्या हालचालीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेऊन कोणताही अनुचित प्रकार अथवा अप्रिय घटना घडू नये म्हणून सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे सातारा जिल्ह्यात योग्य व परिणामकारक अशी सुरक्षा व्यवस्था राबविण्यात आली आहे. आपण एक दक्ष अथवा जागरुक नागरिक म्हणून आजुबाजुस घडणार्या संशयास्पद हालचाली, समाजविघातक व्यक्ती अथवा अनोळखी व्यक्ती, बेवारस वस्तू, वाहने व आकर्षक वस्तु यांची नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा सातारा जिल्हा नियंत्रण कक्ष या ठिकाणी दुरध्वनी क्रमांक 100 अथवा 02162-233833 व हेल्पलाईन क्रमांक 9011181888 वर तातडीने कळवावी. स्थानिक पातळीवर जनतेमार्फत राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्यासाठी वैयक्तिरित्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमावेळी लहान मुलांना कागदी तसेच प्लॅस्टीकचे ध्वज देण्यात येऊ नयेत, असेही आवाहन श्री. पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.