सातारा : सातारा शहरातील मिळकतधारकांच्या घरपट्टीमध्ये सातारा पालिकेने अन्यायकारक घरपट्टीची केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी सातारा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवार दि.12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सातारा नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष सुनील काळेकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
सातारा नगरपरिषदेच्या वतीने सध्या मालमत्ता कराचे नुतणीकरण करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात सातारा शहरातील 31 हजार घरमालकांना करवाढीच्या नोटीसा मिळाल्या आहे. त्यापैकी सुमारे 26 हजार घरमालकांनी नियमानुसार हरकती घेतल्या होत्या. मुल्य निर्धारण अधिकारी यांनी सर्व हरकती फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे सातारकरांवर वाढीव कराचा बोजा येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वास्तविक महाराष्ट्र न.पा. अधिनियम 1965 चे कलम 113 नुसार राज्य शासास शासकीय राज्यपत्रित अधिसूचनेद्वारे (गॅझेट) प्राधिकृत मुल्य निर्धारण अधिकार्याची नेमणुक करता येते. अधिसूचनेत हा अधिकारी कोणत्या शहरातील नेमलेला आहे हे ही नमुद करावे लागते, मात्र सातारा शहराच्या मुल्य निर्धारण अधिकार्यांची नेमणुक राज्य शासनाने केलेली नाही. डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग यांना हा अधिकार शासनाने दिलेला नाही. डायरेक्टर ऑफ टॉऊन प्लॅनिंग यांना कल 169अन्वये अपिल समितीवरील एक सदस्य नियुक्त करता येतो. मात्र मुल्य निर्धारण अधिकार्यास वगळून इतर अधिकार्यास नेमता येते.
याबाबत सातारा पालिकेने कोणत्याही कायद्याचे पालन केलेले नाही. करनिर्धारण अधिकार्याने अनाधिकाराने केलेली 26 हजार घरमालकांची सुनावणी पूर्णपणे बेकायदेशीर असून ती रद्द करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सातारा शहर शाखेतर्फे मार्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा सातारा तालिक संघापासून सुरू होणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व भाजपा शहराध्यक्ष सुनील काळेकर, सरचिटणीस विकास गोसावी, जयदीप ठुसे, विठ्ठल बलशेटवर, राजेंद्र पवार, उपाध्यक्ष आप्पा कोरे, प्रदीप मोरे, महिला आघाडी शहर उपाध्यक्ष जयश्री काळेकर करणार आहेत.