श्रीनगर : काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करून हिजबुल मुजाहिद्दीनच्या म्होरक्यासह तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर खोर्यात तणावाचे आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी हा काल रात्री जवानांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आणि फुटीरतवाद्यांनी बंद पुकारला. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अमरनाथ यात्राही तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना नजरकैदेत ठेवले आहे. तसेच खोर्यातील इंटनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे.
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि पोलिसाच झालेल्या चकमकीत बुरहानला लष्काराने यमसदनी पाठवले आहे. दीर्घ काळ चाललेल्या या चकमकीत बुरहानसोबत तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे. स्वतःचा आणि आपल्या साथीदारांचा फोटो सोशल मीडियावर टाकणारा बुरहान हा पहिला (कमांडर) दहशतवादी होता. बुरहानसोबत ज्या दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यांचा वेगवेगळ्या चकमकीत मृत्यू झाला आहे. बुरहानचा खात्मा हा सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने मोठं यश मानलं जात आहे.
महाराष्ट्राचे 350 पर्यटक काश्मीरमध्ये सुखरुप
काश्मीरमध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून जम्मू व कश्मीर खोर्यातील विविध भागात हिंसाचाराच्या घटना सुरु आहेत. यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, जळगाव, सांगली, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, औरंगाबाद येथील अनेक यात्रेकरु अडकून पडले आहेत.
सध्या यातील यात्रेकरु जम्मू तसेच पेहेलगाम, श्रीनगर तर काही पर्यटक अमृतसर येथे थांबवण्यात आले आहेत. तर कटरा, अनंतनाग, बालताल येथेही काही पर्यटक असल्याचे सांगण्यात आले. अनंतनाग येथे नाशिकच्या बसवर दगडफेक झाल्याने या पर्यटकांविषयी चिंता व्यक्त करण्यात येत असून, तेथील संपर्क साधण्याची सर्वच साधने बंद असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. या भागात केवळ भारत दूरसंचार निगमची सेवा सुरु असल्याने काही भाविकांशी संपर्क होत आहे. जम्मू येथील स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत पर्यटकांची सुटका केल्याने कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेली नसल्याचे नाशिक शहरातील पंचवटी येथील संजय ताडगे यांनी सांगितले. नाशिक येथून नितीन काळे यांच्यासह अॅड रमेश गवळी, सागर शेवाळे, डॉ. विजय जाधव, भूषण शौचे आदी 143 पर्यटक कटरा येथे शनिवारी (दि.9) सुखरुप पोहचले आहे. या पर्यटकांना खासदार हरिश्चंद चव्हाण यांनी प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत मिळवून दिली आहे.