नवी दिल्ली : समुद्रात विषम स्थितीत अडकलेल्या आणि मृत्यूशी झुंज देणार्या सात मासेमारांचे प्राण वाचविण्यासाठी प्रसंगी स्वत:च्या जीवाची बाजी लावणार्या भारतीय नौदल सेवेतील राधिका मेनन या बहादूर महिलेला सागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा पुरस्कार प्राप्त करणार्या राधिका केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील पहिल्याच महिला ठरणार आहेत.
भारतीय नौदलात सुमारे पाच वर्षांपूर्वी दाखल झालेल्या राधिका मेनन यांची या शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, हा एक जागतिक विक्रमच आहे. मासेमार मासेमारी करीत असताना समूद्र अचानक खवळला आणि त्यांची नाव उलटली. सात मासेमार अक्षरश: मृत्यूशी झुंज देत होते. हा भीषण प्रकार बघून राधिका मेनन यांनी समुद्रात उडी घेतली आणि या मासेमारांचे प्राण वाचविले. खवळलेल्या समुद्रातील या अद्भुत साहसाबद्दल मेनन यांना आंतरराष्ट्रीय मरीन संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या सूत्रांनी दिली.
राधिका मेनन यांच्या शौर्याची ही घटना गेल्या वर्षी जून महिन्यातील आहे. आंध्रप्रदेशच्या काकिनाडा येथून ओडिशातील गोपालपूरला जात असलेल्या मासेमारांची नाव समुद्राच्या मध्यात उलटली. खवळलेल्या समुद्रात नौकेचे इंजिन खराब झाल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. मासेमारही समुद्रात बुडाले, अशी वार्ता वार्यासारखी पसरली आणि त्यांच्या घरी शोककळा पसरली. त्यांच्या अंत्यविधीची तयारीही करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच सर्व मासेमारांना सुखरूप वाचविण्यात आल्याची सुखद वार्ता देणारा फोन आला. राधिका मेनन आणि त्यांच्या चमूने सर्व मासेमारांचे प्राण वाचविले होते.
राधिका मेनन सध्या शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या जहाजावर नौदल अधिकारी म्हणून कार्यरत आहे. समुद्रात कुणी संकटात असेल, तर त्याचे प्राण वाचविणे हे मी आपले कर्तव्यच समजते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.