(दै. ग्रामोद्धार)- गेल्या दहा वर्षापासून सातारा शहराच्या विकासासाठी राजकीय सत्ता समिकरण जुळवणार्या मनोमिलनाने पुन्हा एकदा स्वतंत्र दिशांना तोंडे केल्याने सत्तेच्या सारीपाटाचा नुरच बदलून गेला आहे. वीस प्रभागातून दोन्ही आघाड्यांचे पाच वर्षापर्यंत गळ्यात गळे घालणारे उमेदवार स्वतंत्र आघाड्यांमुळे आमने सामने आले आहे. आता 40 जागांचा सत्ता सोपान गाठायचा म्हटल्यावर कार्यकर्त्यांना गोंजारने आपसूकपणे आलेच. गेल्या दहा वर्षात बहुमताच्या जोरावर मनोमिलनाने अनेक निर्णय घेताना नगरसेवकांचा कौल आजमावला खरा पण कार्यकर्त्यांना किंमत मिळाली नाही. त्यामुळे आता कार्यकर्ता आणि त्याची ताकद याचे महत्त्व प्रकषाने अधोरेखीत झाले आहे. वॉररुममधील मतदार याद्या अद्ययावत करण्यापासून ते पडेलते किरकोळ काम करणार्या कार्यकर्त्यांनीच नेता घडत असतो. त्यांच्या पाठबळावरच सत्तेची समिकरणे जुळवली जातात. सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी या विरोधात उभ्या राहिल्याने दोन्ही गोटातील कार्यकर्ते पूर्ण चार्ज झाले आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची संपूर्ण प्रतिष्ठा नगराध्यक्ष निवडीच्या निमित्ताने पणाला लागली आहे. नगरसेवकांच्या निवडणूकीत अपक्षांना जोडीला घेवून नगर विकास आघाडीचा रथ पुढे नेण्यासाठी बाबाराजे प्रयत्नशील आहे. मात्र वेदांतिकाराजे भोसले यांना निवडून आणण्यासाठी बाबांनी सकाळी आठ वाजल्यापासून शहराचा कोपरांनकोपरा पिंजून काढायला सुरुवात केली आहे. अगदी सामान्यातला सामान्य कार्यकर्तासुध्दा आपल्या नजरेतून सुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे. विधानसभेच्या निवडणूकीत सातारा शहराकडे नकळतपणे झालेल्या दुर्लक्षाची किंबहूना पालिकेतल्या नगरसेवकांच्या नाकर्तेपणाची मोठी किंमत शिवेंद्रराजे यांना मोजावी लागली. बाले किल्ल्यात म्हणजे सातारा शहराच्या सहा टापूंमध्ये मतदानाची टक्केवारी घटल्याने आमदार गोटाच्या चिंता वाढल्या होत्या. तरीसुध्दा आमदारकीची अडथळ्याची शर्यत जिंकल्यानंतर इतके दिवस हात दगडाखाली होते आता दगडच हातात आला आहे हे सूचक राजकीय अशाच उद्विग्नतेतून समोर आले होते.
मात्र सातारकरांची माफी मागून बाबाराजेंनी त्यावर पडदा टाकला. म्हणूनच शिवेंद्रराजे यांना आता कोणतीही रिस्क नको आहे. कार्यकर्ता म्हणून त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करणे आणि नाराजांची स्वत: समजूत काढणे ही मोहिमच आमदारांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. आघाडीतले नाराजीचे डॅमेज कंट्रोल करण्यात शिवेंद्रराजे यांना यश आले. खा. उदयनराजे यांनी मनोमिलनाच्या अटी शर्तीत दादा नगरसेवकांना वगळण्याची सूचना केली होती. मात्र शिवेंद्रराजे यांनी वर्षानूवर्षे साथ देणार्या कार्यकर्त्यांचे मन जाणले आणि पुन्हा चार ठिकाणी त्याच चेहर्यांना संधी दिली. ज्यांना पाच वर्ष ब्रेक मिळाला त्यांना पुन्हा पालिकेच्या आखाड्यात उतरवले आहे. सत्तेच्या मोजपट्टीत स्वत:ला बांधून घेण्यासाठी नगर विकास आघाडी संयमितपणे वाटचाल करतेय. पण यामध्ये कार्यकर्त्याचा भाव वधारला हे निश्चित. (दै. ग्रामोद्धार)
कार्यकर्त्यांचा भाव वधारला
RELATED ARTICLES