वडूज : खटाव तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार धनंजय क्षीरसागर यांच्यावर आज झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात खटाव तालुक्यातील पत्रकार, पत्रकार मित्र, विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी उत्स्फूर्त मूक मोर्चा काढून, तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करीत निषेध नोंदविला.
याबाबत अधिक माहिती अशी, श्री. क्षीरसागर हे आज सकाळी नऊ वाजणेच्या सुमारास वाकेश्वर या त्यांच्या मूळगावी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी गेले असता गावातील दिलीप पांडूरंग जगदाळे याने तू गावचा पुढारी झालास का ? तू मोठा पत्रकार झालास का? आमच्या विरोधात बातम्या का देतोस? तूला जिवंत सोडणार नाही असे म्हणत व शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम व अमानुषपणे मारहाण केली. या बाबत जगदाळे याच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी श्री. क्षीरसागर व अन्य गावातील सहकार्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पत्रकार क्षीरसागर यांना अमानुषपणे मारहाण झाल्याची माहिती समजताच तालुक्यातील पत्रकार, पत्रकार मित्र तसेच विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमा झाले. त्यानंतर येथील बाजार चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्या पत्रकारांवर गेल्या काही महिन्यांत भ्याड हल्ले होऊ लागले आहेत. ही बाब घटनात्मकदृष्ट्या निंदनीय आहे. पत्रकारांवर हल्ले करणार्या दृष्ट प्रवृत्तींना कडक शासन होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले शासन व प्रशासनाने गांभीर्याने घ्यावेत. पत्रकारांवर होणार्या हल्ल्या विरोधात संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे. समाजातील अपप्रवृत्ती विरोधात पत्रकार लेखणीचा वापर करतात, समाजहितासाठी दृष्ट प्रवृत्तींवर अंकुश ठेवतात तेव्हा त्या पत्रकारांवर भ्याड हल्ले होतात अशा प्रवृत्तींना समाजाने पाठीशी घालु नये. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा बसावा अशी मागणी यावेळी मान्यवरांनी केली. आंदोलकांच्या वतीने नूतन तहसिलदार सिमा होळकर यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत धनंजय क्षीरसागर यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास सपोनि आर. एस. गायकवाड करीत आहेत. दरम्यान माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख, रासपचे सरचिटणीस शेखर गोरे, मायणी अर्बन बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, भाजपाचे तालुका अध्यक्ष विकल्प शहा, शिवसेना तालुका प्रमुख प्रताप जाधव आदींनी या बाबींचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.