हिलटॉप सोसायटी, श्री. व सौ. नगरमध्ये दि. 7 रोजी पाहणी
सातारा : शाहूनगर येथील हिल टॉप सोसायटी, श्री. व सौ. नगर अपार्टमेंट आणि चारभिंतीच्या खाली नव्याने वसलेल्या नागरिकांसाठी पोवई नाक्यावर जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता व्हावा, अशी मागणी तेथील नागरिकांची आहे. यासाठी सुमारे 15 फूट रुंद रस्ता करणे गरजेचे असून यासाठी श्री व सौ अपार्टमेंटमधील नागरिक पाच फुटांची जागा देण्यास तयार आहेत. उर्वरीत 10 फुट जागा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने द्यावी, अशी नागरिकांची मागणी असून यासंदर्भात दि. 7 रोजी संबंधित सर्व अधिकार्यांनी पाहणी करुन तातडीने निर्णय घ्यावा, अशा सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
हिल टॉप सोसायटी, श्री व सौ नगर आणि हिलटॉप विकास सेवा मंडळ यांच्या मागणीवरुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली सदर रस्त्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एच. मोहिते, शाखा अभियंता एस. पी. माळी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांच्यासह संबंधीत अधिकारी उपस्थित होते. यावेळी फिरोज पठाण, सुशांत महाजन, विनायक चव्हाण व बैठकीस उपस्थित महिलांनी रस्त्याच्या समस्येबाबत माहिती दिली. हिलटॉप सोसायटी, श्री व सौ नगर तसेच चारभिंतीखालील सुमारे 350 घरातील नागरिकांना पोवई नाक्यावर जाण्यासाठी मोनार्क हॉटेलच्या मार्गाने वळसा घालून जावे लागते. शाहुनगरमधील सर्व नागरिकांच्या सोयीसाठी श्री व सौ नगर व प्राधिकरणाच्या जागेतून 15 फूट रुंद रस्त्याची निर्मीती करण्याची मागणी उपस्थित नागरिकांनी केली. यासाठी श्री व सौ नगरमधील नागरिक पाच फूट जागा देण्यास तयार असून उर्वरीत 10 फूट जागा प्राधिकरणाने द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
यावेळी सदर परिसराचा नकाशा पाहून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तहसिलदार चव्हाण, बांधकाम विभागाचे मोहिते, प्राधिकरणाचे गायकवाड यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता स्वत: आ. शिवेंद्रसिंहराजे संबंधीत अधिकार्यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी करणार असून त्यानंतर रस्त्याचा करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तत्पुर्वी बांधकाम विभागाने रस्त्याची मापे घेण्याची सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्यांना केली. दरम्यान, सदर रस्त्यासाठी आमदार फंड अथवा अन्य कोणत्याही योजनेतून निधी उपलब्ध करुन देवू. मात्र प्राधिकरणाने रस्त्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे. किमान चारचाकी वाहने ये- जा करतील अशी रस्त्याची रुंदी आवश्यक आहे. त्यामुळे प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर तातडीने रस्त्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित नागरिकांना दिले.
बैठकीस सुधाकर सावंत, अंकुश साळुंखे, रोहन घोरपडे, धैर्यशील टोणपे, अनिल म्हमाणे, डॉ. विजयसिंह बर्गे, मिलिंद कांबळे, मेजर शिंदे, महामुणे, सौ. कलावती चव्हाण, सौ. सीमा घोरपडे, सौ. शालन थोरात, सौ. उमा चौगुले, सौ. अर्चना कदम, सौ. शशिकला पवार, सौ. सुचिता पवार, सौ. सुरेखा जाधव, सौ. पदमिनी म्हमाणे, सुभाष पिसाळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.