सातारा दि. ( प्रतिनिधी ) शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखूनच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा – महाविद्यालये सुरू केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या कैक पिढ्या घडल्या. जर शाळा – महाविद्यालये काढली नसते तर महाराष्ट्राचे नुकसान झाले असते. बहुजनांच्या शिक्षणासाठीची कर्मवीर अण्णांची धडपड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिली – अनुभवली, म्हणूनच डॉ. आंबेडकर आणि भाऊराव पाटील यांच्यातला जिव्हाळा, वैचारिक स्नेह अधिक घट्ट झाला. या दोन्ही युगपुरुषांचा विचारवारसा आपण जपला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनिणीच्या बागेतील शाहू बोर्डिंगला भेट दिली. त्या भेटीचा ९६ वा वर्धापन दिन साताऱ्यातील विविध परिवर्तन संस्था संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अध्यक्षस्थानाहून प्राचार्य अरुण गाडे बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनाचे तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत वसतिगृहाचे प्रमुख प्रशांत गुजरे, हरिदास जाधव आदीची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य अरुण गाडे पुढे म्हणाले, कर्मवीर अण्णांनी हे शाहू बोर्डिंग सुरू केल्यानंतर जेव्हा या बोर्डिंगला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली त्यावेळी सर्व जातीधर्माची मुले इथे एकत्र राहतात, एकत्र जेवतात हे पाहून त्यांना आनंद झाला. डॉ. आंबेडकरांनी या बोर्डिंगमध्ये विद्यार्थ्यांसोबत ज्वारीची भाकरी आणि लसणाची चटणी खाल्ली. शिवाय २० रुपये देणगीही दिली. शाहू बोर्डिंग भाऊरावांच्या आणि डॉ. आंबेडकरांच्या भेटीची साक्ष आणि प्रेरणा देणारी ऐतिहासिक वास्तू ठरली आहे. या वास्तूतून नव्या पिढ्या कायम घडत रहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शाळा प्रवेश दिनाचे तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी आपल्या भाषणात भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंध उलगडून दाखवला. शाहू बोर्डिंगला डॉ. आंबेडकरांनी दिलेली भेट आणि शिका संघटित व्हा अन् संघर्ष करा हा दिलेला मूलमंत्र यासंबंधाने विश्लेषण केले. ७५ वय असणारे या बोर्डिगचे विद्यार्थी हरिदास जाधव यांचेही भावस्पर्शी मनोगत झाले. याच बोर्डिंगमध्ये मी शिकलो आणि घडलो. पुढे शिक्षक आणि मुख्याध्यापक झालो. त्यामुळे आज या बोर्डिंगमध्ये उभे राहताना अभिमानाने ऊर भरून येत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान चंद्रकांत खंडाईत, सुधाकर शिलवंत, बी. एल. माने, मच्छिंद्र जाधव यांचीही भाषणे झाले. प्रारंभी डॉ. शाहीर श्रीरंग रणदिवे यांच्या पोवाड्याने सुरूवात झाली. प्रास्तविक प्रशांत गुजरे यांनी केले तर नारायण जावलीकर या़ंनी आभार मानले. या दरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.