Saturday, March 22, 2025
Homeठळक घडामोडीधोम धरणाच्या कालव्याचे झाले गटारगंगेत पुनर्वसन....

धोम धरणाच्या कालव्याचे झाले गटारगंगेत पुनर्वसन….

(अजित जगताप).
सायगाव दि: महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत धरणाच्या कालवे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे धोम धरणाच्या कालव्याचे जावळी तालुक्यात गटारगंगेत पुनर्वसन झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
याबाबत आता नेमका जाब कुणाला विचारावा ? अशी परवड सर्वसामान्य शेतकऱ्यांची झाली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम गावच्या हद्दीमध्ये कृष्णा नदीवर धोम धरण बांधण्यात आले.१९६८ ते १९७७ या कालावधीमध्ये मातीचा भराव व दगडी बांधकाम करून ६१.१८ मीटर एवढ हे धरण उभे राहिले. या धरणांमधून डावा कालवा ११३ किलोमीटर व उजवा कालवा ५८ किलोमीटर असून गेल्या. ४५ वर्ष या उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु, या कालव्याची देखभाल व दुरुस्ती संबंधित ठेकेदार व्यवस्थित करत नसल्याने सध्या या कालव्यात आता झाडझुडपे उगवली आहेत.
धोम धरणातील पाण्याचे प्रवाहातून गळती राजेरोसपणाने सुरू आहे. या गळतीला भगदाड पडल्यामुळे उन्हाळ्यात व्याजवाडी व पांडे या गावात कालवा फुटून प्रचंड नुकसान झाले होते .अद्यापही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. ओढया नजीक धोम धरणाच्या कालव्याचे पाणी शिरल्यामुळे ऊसतोड कामगारांचे संसार पाण्यात वाहून गेले होते. याचा अनुभव असून सुद्धा या कालव्याची साफ-सफाई गवत व घाण काढण्यास पाटबंधारे विभागाला सवड नाही. राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सध्या या कालव्या शेजारील रस्ते सुद्धा खड्डेमय झाले आहेत.
जावळी तालुक्यातील प्रभूचीवाडी, सायगाव, खर्शी तर्फ कुडाळ, सोनगाव, लिंब, रायगाव परिसरातून हा कालवा जात आहे. शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभाग पाणीपट्टी कर वसुली करते. परंतु या कालव्याची देखभाल व दुरुस्ती करणे याबाबत दुर्लक्ष करत आहेत. सातारा जिल्ह्यातील डझनभर शेतकरी संघटना फक्त उसाच्या दरातच गुरफटून गेल्यामुळे त्यांच्याकडे याबाबत लक्ष देण्यास वेळ नाही. अशी आता टीका होऊ लागलेली आहे. आणखीन काही वर्षात या कालव्याचे रूपांतर किंवा पुनर्वसन हे गटारगंगेत होईल. अशी भीती शेतकरी वर्गाला निश्चितच वाटू लागलेले आहे.
पाटबंधारे विभागाच्या कालव्या नजिकच अतिक्रमण करून मोठमोठे शेड उभे केलेले आहे. भविष्यात कालव्यावर सुद्धा स्लॅप टाकून घर बांधली तर आश्चर्य वाटणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेवटी भूमिपुत्रांच्या या ठिकाणी जागा संपादित करून कालवे बांधलेले आहेत. धरण बांधलेले आहेत. त्यांना त्याचा मोबदला मिळाला असला तरी कालव्याची जर देखभाली व दुरुस्ती जर शक्य होत नसेल तर राष्ट्रीय महामार्ग जसे बांधा… वापरावा… हस्तांतरित करा… याच धर्तीवर आता कालवे सुद्धा खाजगीकरणातून देखभाल दुरुस्ती करावी. अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे व शेतकरी संघटना तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी केलेले आहे. धोम धरण व कालव्यासाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यांना उर्वरित जमीन परत देऊन त्यांच्या नावावर वाढीव गावठाण किंवा सातबारा करावा अशी ही मागणी पुढे आलेली आहे. सध्या ग्रामीण भागात जागा कमी पडत असल्यामुळे ज्यांच्या जमिनी कालव्यामध्ये गेलेले आहेत. त्यांना आता उर्वरित जमिनीवर अतिक्रमण करण्याशिवाय पर्याय राहिलेले नाही. याचाही सहानभूतीने विचार व्हावा. दरम्यान, सध्या संपूर्ण राज्यातच प्रशासकीय कारभार हाती असल्यामुळे लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्यास मर्यादा येऊ लागलेले आहेत. त्यामुळे त्वरित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी पुढे आलेले आहे.
…………………………….
फोटो जावळी तालुक्यातील धोम धरण कालव्याची झालेली अवस्था (छाया- अजित जगताप, सातारा)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular