सातारा : राष्ट्रीय निवृत्तवेतन योजना ही शासकीय सेवकाचा वैयक्तिक विषय असून सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी या योजनेच्या प्रक्रीयेची तसेच मिळणार्या सेवा व लाभांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज केले.
येथील पशुसंवर्धन कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सेवा पंधरवडयाच्या निमित्ताने कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्जवलनाने करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी दिपक शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व्हि.के.पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महादेव शिरोळकर, अपर कोषागार अधिकारी के. आर. पोतदार, शितल पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यावेळी पुढे म्हणाले, दिनांक 1 जानेवारी 2004 पासून केंद्र शासनाने तर 1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय कर्मचार्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली होती. या योजनेचे 1 एप्रिल 2015 पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना असे नामकरण करण्यात आले. या योजनेव्दारे शासकीय कर्मचार्याच्या मुळवेतन व महागाई भत्याच्या 10 टक्के कपात दरमहा वेतनातून करण्यात येत असून शासनाचेही तेवढेच अंशदान कर्मचार्यांच्या निवृत्ती वेतन खाती जमा होत असते. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत जमा होणारे अंशदान हे शासन भारतीय स्टेट बँक, भारत जीवन विमा निगम व युनिट ट्रस्ट ऑफ इंडियामध्ये गुंतवणूक करीत असून यावर मिळणार्या लाभावर शासकीय कर्मचार्यांना निवृत्तीवेतन देणार आहे.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची प्रक्रीया ही पुर्णपणे इलेक्ट्रानिक पध्दतीने होत असून याला कायदेशीर महत्व आहे. याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे जमा होणार्या अंशदानाची माहिती पारदर्शकपणे कर्मचार्यास एसएमएस व ईमेलव्दारे मिळत आहे. शासकीय कर्मचारी एका शासकीय विभागातून दुसर्या विभागात बदलून अथवा इतर कारणाने गेल्यास त्याला मिळणारा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ कायम राहणार आहे. यावेळी उपस्थित सर्व आहरण व संवितरण अधिकार्यांना तसेच या योजनेचे काम पहाणार्या कर्मचार्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेविषयी असणार्या शंकाचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कोषागार अधिकारी दिपक शिंदे यांनी केले. आभार अपर कोषागार अधिकारी शितल पाटील यांनी मानले. कार्यक्रमास उपकोषागार अधिकारी एस. एस. चाळके, उपलेखापाल एल.जी. जाधव, एम.एच. गोसावी, डि.जे. कळस्कर, पर्यवेक्षक यु.डी. चांडवले, एन. एस. लांडगे, विठ्ठल पवार, विनोद यादव तसेच विविध कार्यालयांचे आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.