लंडन: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना गुरुवारपासून (9 जून) ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. 0-2 अशा पिछाडीवर पडलेल्या श्रीलंकेसमोर व्हॉईटवॉश टाळण्याचे आव्हान आहे.
कसोटी क्रमवारीतील (रँकिंग) अव्वल दहामध्ये असलेल्या श्रीलंकेकडून (आठवे स्थान) इंग्लंडला चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र फलंदाजी ढेपाळली आणि मोठया पराभवांना सामोरे जावे लागले. पहिल्या कसोटीत श्रीलंकेला (91+119) यजमानांच्या एका डावाइतक्या (298) धावाही करता आल्या नाहीत. दुसर्या कसोटीत इंग्लंडच्या 9 बाद 498 धावांच्या (डाव घोषित) प्रत्युत्तरादाखल पहिला डाव 101 धावांत आटोपल्यानंतर श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली.
दुसर्या डावात पाहुण्यांनी चार सत्रे खेळून काढताना पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला तरी पहिल्या डावातील हाराकिरी त्यांना नडली. तिसरी आणि अंतिम कसोटी किमान अनिर्णीत राखून व्हाईटवॉशफ टाळण्याचा प्रयत्न अँजेलो मॅथ्यूज आणि सहकारी करतील. मात्र त्यासाठी फलंदाजी उंचवायला हवी.
दोन कसोटीतील चार डावांत श्रीलंकेतर्फे एक शतक आणि चार अर्धशतकांची नोंद झाली आहे. एकमेव शतक दिनेश चंडिमलचे आहे. कर्णधार मॅथ्यूजसह कुशल मेंडिस, कौशल सिल्वा आणि रंगना हेरथने एकेकदा अर्धशतकी मजल मारली आहे.