सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाजवळून मोनार्क चौकाजवळून जाणार्या संरक्षक भिंतीच्या लगत आठ ते दहा टपरी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. याच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली असून सदरचे अतिक्रमण हे अपघाताला निमंत्रण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अतिक्रमणाकडे सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. सातारा नगर पालिकेचे नवनिर्वाचित अधिकारी शंकर गोरे तातडीने लक्ष घालून अतिक्रमण दूर करावे अशी मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की हॉटेल महाराजाजवळ मोनार्कच्या बाजुकडून रस्त्याच्या कडेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यालय आहे. त्याच्या संरक्षक भिंतीलगत गेल्या दोन वर्षापासून वडा-पाव, पान टपरी, भाजी विक्रेता, लस्सी विक्रेता, चायनीज विक्रेता, पाव भाजी विके्रता, सरबत विक्रेता यांनी बेकायदेशीरपणे गाडे लावून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. हे अतिक्रमण दूर करण्यासाठी यापूर्वी सातारा पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न झाला होता. मात्र तात्पुरत्या स्वरूपात अतिक्रमण हटविण्यात आले होते. कालांतराने व्यवसायिकांनी त्याच ठिकाणी आपले गाड्या पुन्हा लावून अतिक्रमण तसेच चालू केले आहे. याच रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी, नोकर-चाकर वर्ग ये जा करीत असतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये पाण्याच्या अनुषंगाने नागरिकांची वर्दळ चालूच असते. व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहन चालविणेही मुश्कील होत आहे. याबाबत तातडीने सातारा पालिकेच्या पदाधिकार्यांनी लक्ष घालून अतिक्रमण दूर करावे अशी मागणी होत आहे.