सातारा : स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या विशेष पथकाने महामार्गावरील बाँम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा रचून पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास जेरबध्द केले आहे. त्याच्याकडून सातारा शहरातील तीन तर कराड शहरातील एक अशा एकुण चार चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रमेश गर्जे, सहा.फौजदार सुरेंद्र पानसांडे, पो. हवा. मोहन घोरपडे, उत्तम दबडे, तानाजी माने, पो. ना. विजय कांबळे, शरद बेबले, रूपेश कारंडे, मुबीन मुलाणी, रामा गुरव, पो. कॉ. स्वप्नील शिंदे, मारूती लाटणे, या. पो. ना. संजय जाधव यांच्या विशेष पथकाने खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर 2016 रोजी महामार्गावरील बाँम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा रचून पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारास जेरबध्द केले. सराईत गुन्हेगार हा हिरोहोंडा सी.डी. डिलक्स दुचाकी वरून येताना रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळ असणारी दुचाकीबाबत चौकशी केली असता प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली. नंतर पोलीसी खाक्या दाखविताच त्याने सदरची दुचाकी सातारा बसस्थानकाच्या पाठीमागील पारंगे हॉस्पिटल चौकात स्टेट बँकेसमोर असलेल्या पार्किंगमधून चोरल्याची कबुली दिली. त्याची आणखी झाडाझडती घेवून कसुन चौकशी केली असता कराड शहरात एक तर सातार्यात तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. यामध्ये मोटार सायकल क्र. एम.एच. 11 एजे 0621, एम.एच. 11 एल- 7616, एम.एच. 11 एस. 5170, एम. एच 14 क्यु 0986 असे दुचाकीचे नंबर आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.