
सातारा : सातारा शहरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस शिकवणी चालकाने फूस लावून व लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी नराधम शिकवणी चालक समीर मुजावर याच्यावर तातडीने कारवाई करावी या मागणीचे निवेदन आज पिडीत मुलीच्या आई-वडिल व नातेवाईक यांनी पोलीस अधिक्षक यांना दिले आहे.
पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांना पिडीत युवतीचे आई-वडिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहरात न्यू इंग्लिश स्कूलजवळील व्हिनस चौकात परिवर्तन क्लासेस आहे. या खाजगी शिकवणीमध्ये आठवीपासून पुढचे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी शिकण्यासाठी येत असतात. या खाजगी क्लासचा चालक समीर मुजावर (वय 37) याने क्लासमधील एका 17 वर्षीय मुलीस फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. विशेष म्हणजे मुजावर याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले असताना अल्पवयीन मुलीवर प्रेम असल्याचे भासवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात मुजावर सारख्या नरधमाने कीड निर्माण केली आहे. त्याला अटक करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी माता-पित्याकडून करण्यात आली आहे.
यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, पिडीत मुलीचे आई-वडिल, नातेवाईक उपस्थित होते.