पाटण: दुर्ग संमेलनाच्यानिमित्ताने आज खर्याअर्थाने आज आपण इतिहासात गेलो आहे. आपला हा सह्याद्रीचा डोंगर दुर्गांसाठी उपयुक्त ठरला आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी हे किल्ले महत्वाचे ठरले. त्यांचे महत्व आज देखील कमी झालेले नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले मात्र अशा दुर्ग संमेलनामुळे या किल्ल्यांचे महत्व आज आपणाला समजले आहे. या दुर्ग संमेलनाच्या माध्यमातून इतिहासाची अभ्यास करणारी पिढी पुढे येत आहे. काळाची गरज ओळखून समाजाला नवी दिशा देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांचे कार्य आपणा सर्वांना पुढे न्यावयाचे आहे, असे आवाहन कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांनी केले.
महाराष्ट्राचे चौथे दुर्ग संमेलनाला पाटण तालुक्यातील टोळेवाडी येथील किल्ले सुंदरगडावर (घेरादातेगड) सुरूवात झाली. या दुर्ग संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दुर्ग संमेलनाचे स्वागताध्यक्ष सरदार श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर, श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे, प्रा. के. एन. देसाई, पांडुरंग बालकवडे, गिरीश जाधव, कुलदीप देसाई, डॉ. संदीप महिंद गुरूजी, दीपक प्रभावळकर, कार्याध्यक्ष सुदामदादा गायकवाड व बकाजी उर्फ चंद्रहार निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते दुर्गपूजन करण्यात आले. याबरोबरच नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. यावेळी घेरादातेगडाच्या इतिहासाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
छ. शाहू महाराज पुढे म्हणाले, संरक्षणाच्यादृष्टीने गडकोट किल्ले महत्वाचे असल्याने त्याकाळी छत्रपतींनी गडांचे महत्व ओळखून गडांची निर्मिती केली होती. त्यांचे पावित्र्य आपण राखले पाहिजे. या किल्ल्यातून स्फूर्ती घेवून आपण वाटचाल करत आहोत. बदलत्या काळात छत्रपती शिवाज महाराज यांच्या कार्यातून व या गड किल्ल्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी स्फूर्ती घेतली पाहिजे. त्याकाळी सेनानी म्हणून पाटणकर घराण्याला महत्वाचे स्थान होते. तसेच त्यांना पाच हजार घोडदोड सांभाळण्याची परवानगी होती. एवढेच नव्हे तर पाटण महालातील जकातीचे हक्क देणारी सनददेखील त्यांना बहाल केली होती ही छोटी गोष्ट नव्हे. छ. शिवाजी महाराज यांचे कार्य अजून संपलेले नाही ते आपणाला पुढे न्यायचे आहे. त्यांचे विचार समाजात रूजविले पाहिजेत, असेही शेवटी त्यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, 17 व्या शतकात छ. शिवाजी महाराजांनी आठरापगड जाती व बाराबलुतेदार मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याचा साक्षीदार हा किल्ला आहे. पाटण महालाच्या आज्ञेत वसंतगड, दातेगड, गुणवंतगड, भैरवगड, वासोटा, जंगलीजयगड, प्रचितीगड असा परिवार आहे. या सात गडांच्या मध्यभागी हा किल्ला आहे. या गडांची निगराणी दातेगडावरून राखली जात असे. त्यामुळे निगराणीचा किल्ला म्हणून दातेगड ओळखला जात होता. या किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्व होते.
दुपारच्या दुसर्या सत्रात नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज म्हणाले, प्रत्येकाच्या घरात शिवाजी जन्मला पाहिजे मात्र तो गणपतीसारखा बलशाली असला पाहिजे. छ. शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांच्या रूपाने आपल्याला वैभव दिले असून ते आपण जपले पाहिजे. जीवाला देव व मनाला महादेव करायचे असेल तर छत्रपतींचे कार्य अंगीकारून जीवनाची वाटचाल करावी. लोकधर्म व राष्ट्रधर्म ही छत्रपतींची शिकवण आहे. त्यामुळे स्वराज्यातील गडकिल्ल्यांचे सरंक्षण करण्याची जबाबदारी आजच्या मावळ्यांवर असून ती आपण प्रामाणिकपणे पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.