सातारा : दोन लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी तोतया पत्रकार महारूद्र ज्ञानदेव कानडे वय 30 रा. गुरूवार पेठ सातारा याला जिल्हा न्यायालयातील दहावे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. व्ही. माने एक वर्षाची शिक्षा व 1 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.
या खटल्याचे सविस्तर वृत असे की, दि 7 ऑक्टोबर 14 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास आरोपी महारूद्र कानडे हा नाईकनगर लक्ष्मी टेकडी सदर बझार येथील कोयना सोसायटीजवळ रहात असलेले लिंबाजी लालसिंग राठोड यांच्या घरी जाऊन, आरोपी कानडे याने मी पत्रकार असून तुमच्या जवळ ब्लॅक मनीचे बंडल असल्याची माहिती माझ्याजवळ आहे याबाबत मी तुमची तक्रार पोलीस ठाण्यात करेन, जर तक्रार करावयाची नसेल व हे प्रकरण मिटविण्यासाठी मला दोन लाख रूपये द्या अशी मागणी करीत, पैसे दिले नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी दमकी दिली. दरम्यान लालसिंग राठोड यांनी याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. बुरसे यांनी करत आरोपी कानडे याला अटक करून जिल्ह्या न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. न्यायालयात आठ साक्षीदार तपासून सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून आरोपी तोतया पत्रकार कानडे याला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वृषाली बडवे यांनी काम पाहिले.