सातारा / प्रतिनिधी
सातारा येथील ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’ची मशाल रविवार, दि. २ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावां-गावांत ग्रामसभांच्या माध्यमातून पेटणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रत्येक गावात ग्रामसभा होतात. विकासकामांच्या अनुषंगाने ठराव करत असतानाच यावेळी मात्र, ग्रामसभांमध्ये फक्त आणि फक्त ‘मराठा क्रांती मोर्चा’चा ठराव करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीनेहे तसे आवाहन केले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबातील अबालवृध्द सहभागी होण्यासाठी ग्रामसभेत शपथ घेणार आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत रविवारी एक मराठा, लाख मराठा’, ‘जय जिजाऊ, जय शिवाजी’, जय भवानी, जय शिवाजी’, ‘तुमचं आमचं नातं कायं… जय भवानी, जय शिवराय’ या घोषणा ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे त्याची उत्सुकता आता प्रत्येकालाच लागून राहिली आहे.
सातारा येथे दि. ३ आॅक्टोबर रोजी ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’ असून त्याची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात, डोंगरकपारी आणि वाडी-वस्तीवर मराठा क्रांतीचा नाद घूमू लागला आहे. प्रत्येक गाडी, घराच्या दरवाजावर मराठा क्रांतीची स्टीकर झळकू लागली आहेत. मराठा क्रांती मोर्चा यशस्वी जिल्हा संयोजन समिती यासाठी अगदी झपाटून कामाला लागली असून मराठा क्रांती मूक मोर्चासाठी आता अवघे २४ तास उरले आहेत. जिल्ह्याच्या इतिहासात नोंद होणारा हा मोर्चा असून पहिल्यांदाच २५ लाख लोक रस्त्यावर उतरणार आहेत. प्रत्येक गावातील युवक, युवती, तरुण, महिला, ग्रामस्थ सहभागी होणार असल्यामुळे प्रत्येकजण मोर्चाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वत: एकटाच सहभागी होणार नाहीतर येताना समवेतही एकाला आणणार, अशी शपथच युवक, युवतींनी घेतली आहे.
सातारा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सातारचा मोर्चा गर्दीचे रेकॉर्ड कसे अबाधित ठेवेल, यासाठी जिल्हा संयोजन समिती गेले पंधरा दिवस रात्रंदिवस झपाटून काम करत आहेत. सातारा जिल्ह्यात आजमितीस पंधराशे ग्रामपंचायती आहेत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा झालीच पाहिजे, असा राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचा दंडक आहे. ग्रामसभेला विशेष अधिकार असल्यामुळे येथे करण्यात येत असलेल्या ठरावांनाही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामसभेत कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबायला हवा त्याचबरोबर त्याचा गैरवापर करणाºयांवरही कडक कारवाई झालीच पाहिजे, असे ठराव मांडण्यात येणार आहेत. हे ठराव मांडत असतानाच सोमवारी होणाºया ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’त मी सहभागी होणार असून गावातील प्रत्येकाने या ‘नवक्रांतीचा साक्षीदार’ होण्यासाठी पुढे यावे, अशी विनंतीही करण्यात येणार आहे.
‘मराठा क्रांती मूक मोर्चा’ची आचारसंहिता, मोर्चात सहभागी होत असताना करण्यात येणाºया गोष्टींचे पालन, घ्यावयाची काळजी याचीही माहिती ग्रामसभेत देण्यात येणार आहे. त्यामुळे आपली स्वत:चीही काळजी घ्यायची आहे आणि आपल्यासमवेत आलेल्यांचीही काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. साताºयात कोठेही कचरा करणार नाही, असेही यावेळी प्रत्येकाला सांगण्यात येणार आहे.
ग्रामसभांमध्ये पेटणार मराठा क्रांतीची ‘मशाल’ ; मोर्चात सहभागी होण्यासाठी गावोगावी होणार एकमुखी ठराव
RELATED ARTICLES