कराड : कर्जबाजारीपणाला कंटाळून येथील बैलबाजार रोडवरील एकाच कुटुंबातील तीन कोवळ्या बालकांसह दांम्पत्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कोयना पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आईसह तीन कोवळ्या बालकांचा मृत्यू झाला आहे. तर पती बचावला आहे. दरम्यान, तीन कोवळ्या मुलांना पुलावरून नदीपात्रात फेकून देवून त्यांचा खून केल्याप्रकरणी दांम्पत्यावर कराड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे 2.45 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सौ.मिनाक्षी अमोल भोंगाळे (वय 23), हर्ष अमोल भोंगाळे (वय 4), श्रवण अमोल भोंगाळे (वय 2) व चार महिन्याची मुलगी अशी मयत झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत. तर अमोल हणमंत भोंगाळे (वय 32) हा नदीपात्रातून सुखरूप बचावला आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून अमोल भोंगाळे याने कुटुंबासमवेत जीवनयात्रा संपवण्याचा घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कराड तालुका हादरून गेला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, अमोल भोंगाळे हा येथील बैलबाजार रोडवरील अजंठा पोल्ट्री फॉर्मसमोरील श्री मळाईदेवी पतसंस्थेशेजारी आपली पत्नी व तीन मुलांसह राहात होता. त्याचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे आहे. अशिक्षित असलेल्या अमोलला 2011 सालापासून कोणताही कामधंदा नव्हता. त्याअगोदर तो हमालीची कामे करत होता. तसेच नातेवाईकाच्या बिअरबारमध्येही तो कामास होता. गेल्या 5-6 वर्षापासून त्याला कोणताही कामधंदा नव्हता त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिवार्हासाठी तो मित्रांकडून हातउसनवारी पैसे उचलत होता. हातउसनवारी उचलत-उचलत त्याच्यावर सुमारे 4 ते 5 लाखाचे कर्ज झाले होते. गेल्या आठवड्यात तो परगावी नातेवाईकांकडे गेला होता त्यावेळी तो लोकांचे पैसे बुडवून पळून गेला आहे अशी चर्चा सुरू होती. तो जेव्हा आपल्या घरी आला त्यावेळी ही बाब त्याच्या निदर्शनास आली. यातून त्याच्या मनात नैराश्याची भावना निर्माण झाली. आज (मंगळवारी ) पहाटे पावणे तीनच्या सुमारास अमोल याने आपली पत्नी सौ.मिनाक्षी व तीन मुले हर्ष, श्रवण आणि चार महिन्याची मुलगी यांना होंडा टीव्ही स्टार मोटारसायकल (क्र. एमए 50 बी 9927) वरून येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कोयना पुलावर घेऊन आला व त्याने आपला भाऊ सतीश शंकर भोंगाळे (रा.इंद्रप्रस्थनगर, बैलबाजार रोड, मलकापूर) यांना मोबाईलवर फोन करून ङ्गआपण पत्नी व मुलासह कोयना पुलावरून उडी टाकून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.फ यावेळी त्याने ङ्गतू तसे करू नकोस, मी तेथे येतो असे सांगितले.फ मात्र त्याचवेळी त्याने फोन कट केला व तीन लहान मुलांना एकवर-एकवर उचलून कोयना पुलावरून खाली नदीपात्रात फेकून दिले. त्यानंतर पती-पत्नीने पुलावरून खाली नदीपात्रात उड्या मारल्या. दरम्यान, घटनास्थळावर तात्काळ त्याचा भाऊ सतीश दाखल झाला. त्यावेळी पुलावर अमोल याची मोटारसायकल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, रूमाल व लेडीज चप्पल असे आढळून आले. त्यानंतर त्याने या घटनेची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव हे पेट्रोलिंगवर असताना त्यांना ही माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पहाटे अमोल हा पाण्यातून बाहेर येऊन बचावला होता. मात्र, पत्नी व तीन मुले आढळून आली नाहीत. आज (मंगळवार) दुपारी 12.45 च्या सुमारास येथील कोयनेश्वर मंदिराजवळील मनोज कुंभार व अनिल धोत्रे यांच्या वीटभट्टी शेजारी घोडखडक पाणवठ्यावर मिनाक्षी बोंगाळे,मुलगा श्रवण व चार महिन्याची बालिका मृतावस्थेत आढळून आली. तर चार वर्षाचा हर्ष याचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नव्हता. या घटनेमुळे कराड तालुका हादरून गेला होता.
दरम्यान, तीन पोटच्या मुलांना पुलावरून कोयना नदीपात्रात फेकून देऊन त्यांचा खून केल्याप्रकरणी अमोल भोंगाळे व मयत सौ.मिनाक्षी भोंगाळे यांच्यावर कराड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सतीश शंकर भोंगाळे यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सपाटे करीत आहेत.