कराडः मराठी मातृभाषा असलेल्या नागरिकांनी आपली स्वाक्षरी इंग्रजीत न करता, मराठी भाषा ज्या लिपीत लिहिली जाते, त्या देवनागरी लिपीत करावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती अभियानाला कराडकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. मी मराठी…स्वाक्षरी मराठी… या अभियानांतर्गत सातारा येथील कवी, अनुवादक, पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी मराठी भाषा संवर्धन व जतन याविषयी तीन दिवस मोहिम राबवली.
येथील जुन्या कृष्णाबाई सांस्कृतिक केंद्रात दिवाळी शॉपिंग फेस्टीव्हल धमाका नावाचे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात वारुंजीकर यांनी मराठी भाषासंवर्धनाविषयी ही मोहिम राबवली. ब्रिटीश भारत सोडून गेले त्याला 69 वर्षे होवूनही, आजही आपण खोट्या प्रतिष्ठेपायी, कुणाचे तरी अंधानुकरण करत आपली स्वत:ची ओळख असलेली स्वाक्षरी, इंग्रजी भाषेच्या लिपीत करतो. ही मानसिक गुलामगिरी असून यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने आपली स्वाक्षरी राष्ट्रीय लिपी देवनागरीत करावी, म्हणून वारुंजीकर यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. किमान 40 हून अधिक जणांनी आपल्या देवनागरी स्वाक्षरीचे नमुने गिरवले. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. कहाडचे स्वाक्षरी संग्राहक सतिश पेंढरकर, वैद्य नचिकेत वाचासुंदर, डॉ. गिरीश व गायत्री जोशी, एलआयसीच्या शुभदा बिंदगे, माधुरी रानभरे, ब्युटिशियन माधुरी धोंगडी आदी मान्यवरांनी या अभियानात आपला सक्रीय सहभाग नोंदवला. सामाजिक माध्यमांतूनही या अभियानाची गरज अनेकांनी व्यक्त केली.
देवनागरी स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES